लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच मुलाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृतक चालक असून जुन्या वादातून त्याची हत्या करण्यात आली.
अभिषेक राजकुमार पिंपळीकर (२५, सूरजनगर, वाठोडा) असे मृतकाचे नाव आहे. अभिषेक हा चालक होता. तर त्याच्याच वस्तीत राहणारा प्रकाश गायकवाड हा आरोपी आहे. अभिषेक हा त्याची आई मीना यांच्यासोबत राहत होता. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने मीना या स्वयंपाकाचे काम करतात व अभिषेक खाजगी चालक म्हणून काम करायचा. रविवारी अभिषेकच्या वडिलांचे श्राद्ध होते. त्याने पुजा केली व सायंकाळी सहा वाजता बाहेर जाऊन येतो असे म्हणून घरातून निघाला. रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास शेजारील मुलगा आरडाओरड करत आला व मीना यांना अभिषेक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. मीना यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तिथे अभिषेक रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आला. त्यांनी त्याला विचारणा केली असता वस्तीतीलच प्रकाश गायकवाडने जुन्या वादातून मारल्याचे सांगितले. मीना यांचा आक्रोश ऐकून वस्तीतील इतर लोक जमा झाले. अभिषेकच्या मित्रांनी त्याला मेडिकलमध्ये नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मीना यांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीच मुलाची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे त्याच्या आईला मोठा धक्का बसला आहे.