एकतेसाठी धावले नागपूर !

By Admin | Updated: November 1, 2014 02:43 IST2014-11-01T02:43:48+5:302014-11-01T02:43:48+5:30

देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांना सलाम म्हणून हजारो ...

Nagpur run for unity | एकतेसाठी धावले नागपूर !

एकतेसाठी धावले नागपूर !

नागपूर : देशाची एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांना सलाम म्हणून हजारो नागपूरकरांनी शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडीत (रन फॉर युनिटी) उत्साहाने भाग घेतला.
दौडीत विद्यार्थी, खेळाडू, अधिकारी, पोलीस, एनसीसी आणि एनएसएस कॅडेटसह आबालवृद्धांचा सहभाग होता. सकाळी ७.४५ वाजता दौडीचा प्रारंभ झाला. दहा वर्षांच्या स्केटिंग करणाऱ्या मुलींपासून ७५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सारेच देशासाठी धावले.
या दौडीत उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, गिरीश जोशी, संगीतराव, अजय रामटेके, प्रकाश पाटील, दिलीप सावरकर, आशा पठाण, अनिता मेश्राम, सुजाता गंधे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. सोबतीला विविध रंगी पोशाखात असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांमुळे वातावरण क्रीडामय झाले होते. सोबतीला राष्ट्रध्वजही होते. अनेकांनी भारतमाता की जय..., सरदार पटेल अमर रहे... अशा गगनभेदी घोषणा देत राष्ट्रभक्ती जागविण्याचा प्रयत्न केला. आकाशवाणी चौक, व्हीसीए चौक, एनआयटी चौक, एलआयसी चौकमार्गे दौड संविधान चौकात आल्यानंतर दौडीची सांगता झाली. प्रारंभी संविधान चौकातील मुख्य व्यासपीठावर विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी हजारो उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर सहपोलिस आयुक्त अनुपकुमारसिंग, मनपा आयुक्त शाम वर्धने, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, सीईओ शिवाजीराव जोंधळे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त हेमंत पवार, प्रभारी क्रीडा उपसंचालक विजय संतान, उपायुक्त अप्पासाहेब धुळज यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन मनपा अतिरिक्त आयुक्त प्रमोद भुसारी आणि रेणुका देशकर यांनी केले.

Web Title: Nagpur run for unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.