नागपूर आरटीओने तपासणी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी केली ६७ दोषी वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2023 22:10 IST2023-03-25T22:09:47+5:302023-03-25T22:10:15+5:30
Nagpur News पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शनिवारपासून विशेष वाहन तपासणी मोहिम हाती घेतली आहे.

नागपूर आरटीओने तपासणी मोहिमेच्या पहिल्याच दिवशी केली ६७ दोषी वाहनांवर कारवाई
नागपूर : पोलीस आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शनिवारपासून विशेष वाहन तपासणी मोहिम हाती घेतली. पहिल्याच दिवशी ६७ दोषी वाहनांवर कारवाई करीत तब्बल १९ वाहने ताब्यात घेतली. दोन्ही आरटीओच्या या कारवाईने वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
शहराच्या वाडी, पारडी, अमरावती रोड, बर्डी ते विमानतळ रोड आदी विविध भागात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत नागपूर शहर आरटीओच्या वायुवेग पथकाने जवळपास २०० वर वाहनांची तपासणी केली. प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला अनधिकृत उभे केलेले ट्रक, आॅटोरिक्षा, बस आदी दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा १९८८ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात आली.
पथकाने ३२ दोषी वाहनांवर दंडात्मक तर ५ वाहने ताब्यात घेऊन कार्यालयात अटकावून ठेवली. तर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने ३५ दोषी वाहनांवर कारवाई केली. सोबतच १४ वाहने कार्यालयात अटकावून ठेवली. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांच्या मार्गदर्शनात मोटार वाहन निरीक्षक अर्चना घाणेगावकर, वीरसेन ढवळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक स्नेहल पराशर, व्यंकटेश सिंदम, सुजय भवरे, स्वप्निल अटेल आदींनी केली.