नागपुरात ४९२ विदेशी नागरिकांचे वास्तव्य

By Admin | Updated: May 26, 2017 02:39 IST2017-05-26T02:39:47+5:302017-05-26T02:39:47+5:30

भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात सद्यस्थितीला ४९२ विदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे. वेगवेगळे कारण

Nagpur resides in 492 foreign nationals | नागपुरात ४९२ विदेशी नागरिकांचे वास्तव्य

नागपुरात ४९२ विदेशी नागरिकांचे वास्तव्य

याशूवाच्या अनधिकृत वास्तव्यानंतर तपास यंत्रणा सतर्क : प्रत्येकाची शहानिशा
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताचे हृदयस्थळ असलेल्या नागपुरात सद्यस्थितीला ४९२ विदेशी नागरिकांचे वास्तव्य आहे. वेगवेगळे कारण आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी नागपुरात वास्तव्याला असलेल्या या विदेशी पाहुण्यांमध्ये अमेरिका, रशिया, चीन, जपान, इंग्लंडसह पाकिस्तानमधील नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अमेरिकन नागरिक याशूवा लॅबोविथच्या अनधिकृत वास्तव्याचा खळबळजनक प्रकार उघड झाल्यानंतर सतर्क झालेल्या तपास यंत्रणांकडून विदेशी नागरिकांच्या वास्तव्याबाबत चौकशी सुरू झाली. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.
विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या नागपूर शहरात विदेशी पाहुण्यांचा नेहमीच राबता असतो. पोलिसांची विशेष शाखा आणि खुपिया (गुप्तहेर) खाते सोडल्यास त्याकडे कुणाचे फारसे लक्ष नसते. मात्र, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही याशूवा मेसियाक लॅबोविथ (वय ३५) नामक अमेरिकन नागरिक गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात लपून छपून वास्तव्य करीत असल्याचे उघड झाल्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलीस अन् प्रशासनच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही याशूवाच्या अनधिकृत वास्तव्यामागचे कारण काय आहे, ते जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. प्राथमिक माहितीत याशूवा अमेरिकन सैन्य दलाचा माजी सैनिक असल्याचे उघड झाल्यामुळे त्याच्या अनधिकृत वास्तव्याचा प्रकार अधिकच गंभीर बनला. तो येथे नेमका कोणत्या उद्देशाने राहत होता, ते स्पष्ट न झाल्यामुळे याशूवा हेरगिरी तर करीत नाही ना, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
या प्रश्नाने प्रशासनाची झोप उडवून दिल्यामुळे अमेरिकन याशूवाच्या अनधिकृत वास्तव्याची अत्यंत गोपनिय पद्धतीने कसून चौकशी केली जात आहे. अमेरिकन दूतावासाच्या कानावरही हा प्रकार घालण्यात आला आहे. या निमित्ताने नागपुरात सध्या किती विदेशी नागरिक वास्तव्याला आहे, असा प्रश्न चर्चेला आला आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी नागपुरात वास्तव्याला असलेल्या विदेशी पाहुण्यांची संबंधित विभागाकडून माहिती काढून त्यांची शहानिशा करणे सुरू केले आहे.
संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे सद्यस्थितीत ४९२ विदेशी पाहुणे वास्तव्याला आहेत. त्यात अमेरिका, रशिया, चीन, जपान, इंग्लंडसह पाकिस्तानमधील नागरिकांचाही समावेश आहे. या विदेशी पाहुण्यांमध्ये ९६ पुरुष, ६९ महिला आणि ७८ युवा आणि २४९ अल्पवयीन मुला-मुलींचा (बालकांचा) समावेश असल्याची माहिती संबंधित सूत्र सांगतात. येथे राहत असणाऱ्या विदेशी पाहुण्यांपैकी बहुतांश मंडळी भारतीय अभिजात संगीत शिकण्याच्या उद्देशाने नागपुरात वास्तव्याला आहेत. अगदी संगीत विशारद वगैरे होण्याकडे त्यांचा कल असल्याचे समजते. काही जण धार्मिक कारणांमुळे, काही जण अध्यात्माच्या ओढीने तर, काही मंडळी पर्यावरणाच्या अभ्यासानिमित्ताने नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरात थांबले आहेत. काही जण मात्र आपल्या नातेवाईकांच्या भेटीला आले असून, काही औषधोपचाराच्या निमित्ताने नागपुरात आलेले आहेत.

पाकिस्तानी नागरिक सर्वाधिक
येथे वास्तव्याला असलेल्या विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक संख्या पाकिस्तानी नागरिकांची आहे. तब्बल २१९ पाकिस्तानी नागरिक काही दिवसांपासून येथे वास्तव्याला आहेत. यातील बहुतांश मंडळी आपल्या नातेवाईकांकडे पाहुणपणाच्या निमित्ताने आलेली आहे. भारताच्या फाळणीनंतर अनेक निर्वासित (शरणार्थी) वेगवेगळ्या शहरात स्थायिक झाले. काही जण भारतात तर काही पाकिस्तानमध्ये राहायला गेले. पाकिस्तानमध्ये गेलेल्या अनेकांचे नातलग भारतातील अन्य शहरांप्रमाणेच नागपुरातही मोठ्या संख्येत आहेत. अशाप्रकारे नागपुरात स्थायिक झालेल्या नागरिकांकडे नियमित पाकिस्तानी पाहुणे येतात. नेहमीच हेकड भूमिका स्वीकारणाऱ्या पाकिस्तानने कुलभूषण जाधव या निर्दोष भारतीय नागरिकाला भारतीय हेर असल्याचे सांगून फासावर टांगण्याचे कारस्थान रचले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचे हात तूर्त बांधले गेले आहे. अशा नाजूक स्थितीत भारताच्या हृदयस्थळी २१९ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य भारतीय दिलेरीचा परिचय ठरावा.

नागपुरात वास्तव्याला आलेल्या विदेशी पाहुण्यांवर आमची सूक्ष्म नजर आहे. ते ज्या कामाच्या निमित्ताने येथे आले तेच करीत आहेत की दुसरे काही, त्याची आम्ही शहानिशा करीत आहोत. त्यांच्या जाण्यायेण्यावरही आमची नजर राहते. प्रत्येकाची त्या त्या भागातील पोलीस ठाण्यात नोंद असते. त्यांच्या व्हिसाची मुदत वगैरे कधीपर्यंत आहे, त्यावरही आम्ही आता नजर ठेवून आहोत.
- नीलेश भरणे
पोलीस उपायुक्त
 

Web Title: Nagpur resides in 492 foreign nationals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.