नागपूर : राज्यात लसीकरणाच्या नवव्या दिवशी, गुरुवारी पहिल्या पाच स्थानावर विदर्भातील एकही जिल्हा नव्हता. पहिल्या क्रमांकावर धुळे जिल्हा होता. येथे १११ टक्के लसीकरण झाले. नागपूर जिल्ह्यात ७२ टक्के लसीकरण झाल्याने, १९व्या क्रमांकावर होता. त्याआधी अमरावती जिल्हा ६ व्या, गोंदिया जिल्हा ९ व्या, गडचिरोली जिल्हा १० व्या, अकोला जिल्हा १३ व्या तर वर्धा जिल्हा १४ व्या स्थानी होता.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात होऊन बारा दिवसांचा कालावधी होत आहे; परंतु ज्या लसीची प्रतीक्षा संपूर्ण जग अकरा महिने करत होते, ती आल्यानंतर मात्र ती टोचून घेण्यासाठी अजूनही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. २८ जानेवारी रोजी नागपूर जिल्ह्यात ३२०० लाभार्थ्यांचे लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी २३१७ म्हणजे ७२. ४१ टक्के लसीकरण झाले. त्या तुलनेत सर्वाधिक लसीकरण झालेल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये धुळे जिल्ह्यात १११ टक्के, बीड जिल्ह्यात ११० टक्के, पालघर जिल्ह्यात ९५.५० टक्के, नांदेड जिल्ह्यात ९२.७० टक्के तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात ९२.७० टक्के लसीकरण झाले. सर्वात कमी लसीकरण बुलडाणा जिल्ह्यात झाले. केवळ ४४ टक्के लसीकरणाची नोंद झाली.
-पूर्व विदर्भात ७६ टक्के लसीकरण
पूर्व विदर्भातील सहा जिल्हे मिळून गुरुवारी ७६ टक्के लसीकरण झाले. सर्वाधिक लसीकरण गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात झाले. या दोन्ही जिल्ह्यात ९० टक्के लोकांना लस देण्यात आली. सर्वात कमी लसीकरण भंडारा जिल्ह्यात झाले. येथे ५८ टक्के लसीकरणाची नोंद झाली. या शिवाय, चंद्रपूर जिल्ह्यात ७१ टक्के, नागपूर ७२.४१ टक्के तर वर्धा जिल्ह्यात ८४ टक्के लसीकरण झाले.
-नागपूर ग्रामीणमध्ये ७४.३५ टक्के लाभार्थ्यांना लस
नागपूर ग्रामीणमधील १४ केंद्र मिळून ७४.३५ टक्के लाभार्थ्यांना लस देण्यात आली. गुरुवारी १४०० लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यानुसार १०४१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. सर्वाधिक लसीकरण लता मंगेशकर हॉस्पिटल, इसासनी येथे झाले. १३७ टक्के लसीकरणाची नोंद झाली. तर सर्वात कमी लसीकरण रामटेक येथील कोविड हेल्थ सेंटरवर झाले. येथे २३ टक्केच लसीकरण झाले.
-नागपूर शहरात ४७३३ लाभार्थ्यांना लस
नागपूर शहरात १६ ते २८ जानेवारी दरम्यान ५६०० लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ४७३३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. याचे प्रमाण ८४.५२ टक्के आहे. शहरात लसीकरणाचे केंद्र सहावरून १८ करण्यात आले आहे. यात मेयोमध्ये दोन, मेडिकलमध्ये दोन, मनपाच्या पाचपावलीमध्ये दोन केंद्र करण्यात आली. सोबतच ऑरेंज सिटी हॉस्पिटल, दंदे हॉस्पिटल, वोक्हार्ट हॉस्पिटल, विमा हॉस्पिटल, जाफरी हॉस्पिटल, कुबडे हॉस्पिटल, भवानी हॉस्पिटल व किंग्जवे हॉस्पिटलमधील केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.