Nagpur Rain: मागील सहा दिवसांपासून अचानकपणे हाेणाऱ्या पावसाचा नागपूर शहरात धुमाकूळ सुरू आहे. शनिवारी सकाळपासून प्रचंड उष्णतेचा त्रास झाल्यानंतर दुपारनंतर धाे-धाे बरसलेल्या पावसाने शहराला जाेरदार तडाखा दिला. विजांचे अक्षरश: तांडव सुरू हाेते. एका गादीच्या दुकानावर वीज काेसळल्याने दुकान जळून खाक झाले, तर जाेराच्या पावसामुळे कुंभारपुरा वस्तीत घराची भींत खचली. अनेक वस्त्यात पाणी शिरले, तर रस्त्यांवर तलाव साचल्याने वाहतूकही विस्कळीत झाली.
साेमवारपासून अचानकपणे तीव्रतेने येणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका नागपूरकरांना बसत आहे. कधी दुपारी, कधी सायंकाळी तर कधी रात्री गडगडाटी पावसाची हजेरी लागत आहे. गुरुवारी सायंकाळी अशाचप्रकारे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी लागली. त्यानंतर शुक्रवारी संपूर्ण दिवसभर ढगांनी शांतता बाळगली. शनिवारीही सकाळपासून ऊन तापले हाेते, ज्यामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास जाणवत हाेता. तापमान १.२ अंशाने वाढून ३४.६ अंशावर पाेहचले हाेते.
दुपारपासून मात्र अचानक चित्र बदलले आणि भयावह गर्जनासह जाेरदार पाऊस सुरू झाला. विशेषत: उत्तर, पूर्व व दक्षिण नागपुरात धाे-धाे पाऊस बरसला. अक्षरश: अंधार पसरला हाेता. साेबत विजांचा थयथयाटही सुरू हाेता. वाठाेडा डम्पिंग यार्डसमाेर शेख इस्तियाक शेख इसाक यांचे गादीचे दुकान आहे. त्या दुकानावरच जाेरदार वीज कडाडली. ज्यामुळे क्षणात आग लागून दुकान पूर्णपणे खाक झाले. सुदैवाने पाऊस सुरू झाल्याने शेख इस्तियाक दुकान बंद करून घराकडे गेले हाेते, ज्यामुळे त्यांचा जीव बचावला. अवघ्या १५ मिनिटातच विजांचा कहर झाला.
दुसरीकडे कुंभारपुरा, पाचपावली येथील मुखरू वालदे यांच्या घराची भींत जाेराच्या पावसामुळे खचली, ज्यामुळे संसार उघड्यावर आला. जवळ राहणाऱ्या मोतीराम मोहाडीकर व अविनाश बनसाेड यांनी झाेन अधिकाऱ्यांना माहिती दिली. झाेनच्या पथकाने घटनास्थळी पाेहचून पंचनामा केला.
अतिशय जाेरात झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्ण नागपुरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. मेडिकल चाैक, माेक्षधाम चाैक व धंताेली परिसरात रस्त्यावर तलाव साचले हाेते, ज्यामुळे वाहतुकीचा खाेळंबा झाल्याचे चित्र हाेते.