नागपूर रेल्वे स्थानकात काही काळ घबराट; संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 14:40 IST2018-10-13T14:39:31+5:302018-10-13T14:40:07+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये दीर्घकाळ बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने काही काळ घबराट उडाली.

नागपूर रेल्वे स्थानकात काही काळ घबराट; संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये बॉम्बचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर आलेल्या संघमित्रा एक्स्प्रेसच्या ए १ कोचमध्ये दीर्घकाळ बेवारस असलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने काही काळ घबराट उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाने हँड मेटल डिटेक्टरच्या साह्याने बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये स्फोटके नाही तर दारूच्या बाटल्या आढळल्याचे पाहून सर्व प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
रेल्वे प्रशासन व प्रवाशांना श्वास रोखून धरायला लावणारी ही घटना शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास घली. शनिवारी रेल्वेगाडी क्रमांक १२२९५ बंगळुर-पटना संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर सकाळी ९ वाजता आली. या गाडीच्या ए १ कोचमध्ये बराच वेळपासून एक बॅग बेवारस स्थितीत ठेवलेली होती. त्यामुळे या कोचमधील प्रवाशांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली. प्लॅटफार्मवर गाडी येताच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विकास शर्मा, शाम झाडोकर, विवेक कनोजिया नियमित तपासणी करीत असताना प्रवाशांनी त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानांनी हँड मेटल डिटेक्टरच्या साह्याने बॅगची तपासणी केली असता त्यात बॉम्ब नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बॅगची तपासणी केली असता पाकिटात दारूच्या ३८७० रुपये किमतीच्या ४ बॉटल आढळल्या. बेवारस बॅगमध्ये दारू असल्याचे समजल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर संघमित्रा एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली.