जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 08:34 PM2020-07-24T20:34:19+5:302020-07-24T20:40:17+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती घराबाहेर दिसल्यास पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत.

Nagpur police ready for Janata curfew | जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिस सज्ज

जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिस सज्ज

Next
ठळक मुद्देजोरदार तयारी : ठिकठिकाणी नाकेबंदी आणि बॅरिकेड्सशहराला जोडणारे सर्व मार्ग बंद : फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच मुभाउल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या दोन दिवसीय जनता कर्फ्यूसाठी नागपूर पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती घराबाहेर दिसल्यास पोलीस त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत.
नागपुरात कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त आणि महापौरांनी नागपुरात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून पोलिसांनी जोरदार तयार केली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आज शुक्रवारी सायंकाळी घेण्यात आली. या बैठकीत दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूच्या बंदोबस्ताचे नियोजन कसे राहील त्यासंबंधाने विचारविमर्श करण्यात आला. शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत दोन ठिकाणी फिक्स पॉईंट आणि दोन ठिकाणी नाकाबंदी लावण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय पोलिसांच्या गस्ती वाहनांवरून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सूचना करण्याचे ठरले. शहरात या दोन दिवसात आपत्कालीन परिस्थितीत फिरणारी वाहने आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणारी वाहने यांनाच केवळ परवानगी राहणार आहे. अन्य कोणत्याही प्रकारची वाहने रस्त्यावर दिसल्यास वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. रस्त्यावर घराबाहेर पडणाऱ्या सर्व सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना आणि अत्यावश्यक सेवेकरिता निवडण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांची ओळखपत्रे जवळ बाळगावी लागणार आहेत. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व सीमा सील
नागपूरला जोडणाऱ्या सर्व सीमा सील केल्या जाणार आहेत. बाहेरगावातून कोणताही व्यक्ती नागपुरात येणार नाही आणि नागपुरातून बाहेर जाऊ शकणार नाही. फक्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तेवढी परवानगी दिली जाणार आहे. शहरातील सर्वच्या सर्व भागात पोलिसांची गस्त राहणार आहे. कर्फ्यूचे उल्लंघन करून विनाकारण बाहेर फिरणाºया व्यक्तींना पोलिसांच्या कडक कारवाईचा सामना करावा लागू शकतो. नागरिकांनी महामारीच्या रूपात आलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.

दंगाविरोधी पथकही सज्ज
जनता कर्फ्यूच्या या दोन दिवसात कुठे काही गडबड, गोंधळ झाला किंवा समाजकंटकांनी कायदा हातात घेऊन आपत्कालीन स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी बीट मार्शल, मोबाईल व्हॅन, शीघ्र कृती दल, दंगाविरोधी पथक तसेच राज्य राखीव पोलिस दलाचे जवान सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांनी दिली आहे.

जनता कर्फ्यूसाठी पोलिसांनी केली तयारी
१ जनता कर्फ्यूसाठी २००० पोलीस, १०० एसआरपीएफ जवान, शीघ्र कृती दलाचे पथक सज्ज
२ प्रत्येक पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात दोन ठिकाणी नाकेबंदी, दोन ठिकाणी बॅरिकेड्स
३ एका ठिकाणी सहा पोलीस आणि एक अधिकारी
४ बीट मार्शलसह दिवसभर रस्त्या-रस्त्यावर फिरणार पोलिसांची वाहने
५ नागपूरला जोडणाऱ्या सर्व सीमा/ नाके सील
६ बाहेरचा व्यक्ती शहरात येऊ शकणार नाही. शहरातला व्यक्ती बाहेर जाऊ शकणार नाही
७ फक्त रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनाच शहरात आणि शहराबाहेर जाण्यास मुभा
८ रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होणार, प्रसंगी दंड्याचा प्रसाद मिळणार

असा राहील बंदोबस्ताचा ताफा
पोलीस अधिकारी ३६४
पोलीस कर्मचारी २३००
होमगार्ड ३४३
एसारपीएफ प्लाटून २
दंगल नियंत्रण पथक ५

Web Title: Nagpur police ready for Janata curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.