नेपाळातील भूकंपाने मोडला नागपूर पोलिसांचा डाव
By Admin | Updated: May 2, 2015 02:19 IST2015-05-02T02:19:28+5:302015-05-02T02:19:28+5:30
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत.

नेपाळातील भूकंपाने मोडला नागपूर पोलिसांचा डाव
जगदीश जोशी नागपूर
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पळून गेलेले खतरनाक गुन्हेगार नेपाळमध्ये आश्रय घेऊन आहेत. या माहितीने नेपाळकडे निघालेल्या शहर गुन्हे शाखा पोलीस पथकाला विध्वंसक भूकंपामुळे आपली मोहीम सोडून सीमेवरूनच परत फिरावे लागले.
शहर पोलिसांची वेगवेगळी पथके तब्बल एक महिन्यांपासून पाचही गुन्हेगारांना हुडकून काढण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत. अनेक शहरे त्यांनी पालथी घातली आहेत. परंतु त्यांना अद्यापही यश आलेले नाही. ३१ मार्च २०१५ च्या पहाटे कारागृहातील बडी गोल बराक क्रमांक ६ मधून खतरनाक गँगस्टर राजा गौस याचे साथीदार सत्येंद्र गुप्ता, मोहम्मद शोऐब ऊर्फ शिबू खान, बिसेनसिंग उईके, याच बराकीतील त्यांचे साथीदार आकाश ऊर्फ गोलू ठाकुर आणि प्रेम ऊर्फ नेपाली खत्री, असे पाच जण पळून गेले. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित आणि कायदा व सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक के. एल. बिष्णोई यांच्याकडे सोपविला.
सीमेवरही मिळाली नाही खबर
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना भारत आणि नेपाळ सीमेवर पलायन केलेल्या या आरोपींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार होती. फरार आरोपींपैकी खत्री हा नेपाळचा रहिवासी आहे. अचानक भूकंप आला. त्याबरोबरच या पोलिसांना ज्या सूत्रांकडून ही माहिती मिळणार होती, ते धुसर झाले.
मोक्का कारवाई अडली
जेल ब्रेक प्रकरणानंतर संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई होणार होती. परंतु ही कारवाई आता अडली आहे. याचसाठी पोलिसांनी गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मोक्का प्रकरणात दोषी कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही आरोपी केले जाऊ शकते.