Nagpur police to adopt 1043 criminals | १०४३ गुन्हेगारांना दत्तक घेणार नागपूर पोलीस
१०४३ गुन्हेगारांना दत्तक घेणार नागपूर पोलीस

ठळक मुद्देगुन्हेगारांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष : संपत्तीवरही ठेवली जाईल नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हेगारांवर प्रत्येक वेळी पाळत राहावी, या उद्देशाने गुन्हेगार दत्तक योजनेला प्रभावी करण्यात आले आहे. पोलिसांनी टॉप टेन गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात अनेक गुन्हेगार एकटे किंवा टोळी बनवून सक्रिय आहेत. पोलिसांनी शहरातील १०४३ गुन्हेगारांची एक यादी तयार केली आहे. या गुन्हेगारांना पोलीस दत्तक घेऊन त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवणार आहे.
सराईत गुन्हेगार हे खून, अपहरण, खंडणी वसुली यासारख्या गुन्ह्यांसह संघटितपणे दहशतसुद्धा निर्माण करीत असतात. ते दारू व मादक पदार्थाची तस्करी, जुगार अड्डे आणि मटकेही चालवतात. अवैध धंद्यांमुळे गुन्ह्यांचा ग्राफ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खूप वर्षांपूर्वी गुन्हेगार दत्तक योजना सुरू केली होती. परंतु मागील काही वर्षांपासून ही योजना थंडबस्त्यात पडली होती. गुन्हे शाखेने त्याला प्रभावीपणे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत गुन्हे शाखा आणि सर्व झोनला १०४३ गुन्हेगारांची माहिती पाठविण्यात आली आहे. या गुन्हेगारांची नियमित चौकशी केली जाईल. शेजारी आणि मित्रांकडून त्यांच्यासंबंधात माहिती घेतली जाईल. हे गुन्हेगार काही चुकीचे काम करीत आहेत का, अवैध धंदे चालवताहेत की नाही, याची माहितीसुद्धा गोळा केली जाईल. पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्हेगारांमध्ये सुरू असलेली भांडणे, वैमनस्य, वाद याची माहिती गोळा करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासही सांगण्यात आले आहे. भरवशाच्या गुन्हेगारास पोलिसांचा खबऱ्या बनवण्यासही तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना सक्रिय गुन्हेगारांच्या वाहनांची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्यांच्या कर्माच्या स्रोतांची माहितीसुद्धा मिळविण्यात येईल. पोलीस गुन्हेगारांचे ‘क्रिमिनल डोजियर’ तयार करून त्यांच्या बैठकीवरही लक्ष ठेवणार आहे. या योजनेमुळे गुन्हे नियंत्रणात येतील, असा पोलिसांना विश्वास आहे. गुन्हेगार दत्तक योजना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहआयुक्त रवींद्र कदम, अपर आयुक्त नीलेश भरणे आणि उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात चालवण्यात येईल.


Web Title: Nagpur police to adopt 1043 criminals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.