नागपुरातच भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन
By Admin | Updated: May 20, 2016 02:51 IST2016-05-20T02:51:26+5:302016-05-20T02:51:26+5:30
तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश नागपुरात कायमस्वरूपी स्थापित करण्यात आला आहे, होय याबाबत फारसा गाजावाजा झाला नसला तरी ही गोष्ट खरी आहे.

नागपुरातच भगवान गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन
थायलंडकडून बुद्धाच्या अस्थिकलशाची अमूल्य भेट : कपिलवस्तू बुद्ध विहारात सात महिन्यांपूर्वीच स्थापित
योगेंद्र शंभरकर नागपूर
तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश नागपुरात कायमस्वरूपी स्थापित करण्यात आला आहे, होय याबाबत फारसा गाजावाजा झाला नसला तरी ही गोष्ट खरी आहे. थायलंडच्या प्रिन्सेस शिरीकॉन यांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरला ही अमूल्य भेट मिळाली असून सात महिन्यांपूर्वीच हा अस्थिकलश उत्तर नागपुरातील नारी रोडवरील कपिलवस्तू बुद्ध विहारामध्ये कायमस्वरूपी स्थापित करण्यात आला आहे. अस्थिकलशाचे दर्शन बुद्ध पौर्णिमेपासून सर्वांसाठी खुले होणार आहे.
थायलंडचे भदंत अनेक हे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर त्यांच्या भिक्खू संघासोबत नेहमी येत असतात. भारत-थायलंड मैत्री संघाचे पदाधिकारी व सदस्य दिनेश पाटील यांच्या माध्यमातून थायलंडमधील दानदाते भारतातील बुद्ध विहारांना बुद्ध प्रतिमा भेट स्वरुपात देत असतात. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या मध्यस्तीने भदंत अनेक यांच्या माध्यमातून देशभरातील विहारांसह कपिलनगर येथील कपिलवस्तू विहाराने तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा आणि बुद्धांच्या अस्थिकलशासाठी निवेदन केले होते. थायलंड संघ टेम्पल कमिटीने प्रिन्सेस शिरीकॉन यांच्या वाढदिवसानिमित्त जगातील काही शहरांसोबतच नागपुरातील कपिलवस्तू विहाराची बुद्ध प्रतिमा व अस्थिकलशासाठी निवड केली.
गेल्यावर्षी २३ आॅक्टोबर २०१५ रोजी भदंत एन. बोधीरत्न नायकथेरो, भदंत प्रज्ञानंद (कपिलवस्तू बुद्ध विहार) आणि आमदार व नगरसेवकांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु तेव्हा तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिकलशाबाबत कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. त्याच दिवशी भदंत अनेक, थायलंडच्याउपासिका दृताईरात जो, खुनोपाकॉन, थनार्कीत जो. खुनापोकॉनसह थायलंड व श्रीलंका येथील ४० भदंतांची चमू भगवान बुद्धाच्या अस्थिकलशासह नागपुरात आले होते. त्यांच्याच हस्ते बुद्ध प्रतिमा व अस्थिकलशाची स्थापना करण्यात आली होती.
तरुणांनी जबाबदारी स्वीकारली
नागपूर : सोबतच सुरक्षा व्यवस्था करण्याची ताकीदही देण्यात आली होती. कपिलवस्तू बुद्ध विहार येथे सात महिन्यांपूर्वीच हा अस्थिकलश स्थापित झाला. बुद्ध विहार समितीला भाग्य लाभले होते. परंतु ते याच्या सुरक्षेसंदर्भात चिंतेतही होते. त्यामुळेच या जागतिक वारसा असलेल्या अस्थिकलशाबाबत फारसा गाजावाजा करण्यात आला नाही. समितीची मंडळी अगोदर सुरक्षेबाबत आपल्याच स्तरावर निश्चिंत होऊ पहात होते. त्यानंतर समिती व परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही स्क्रिनसह काही आवश्यक संसाधनांची व्यवस्था केली. तसेच समता सैनिक दल आणि भीम बॉईज संस्थेच्या तरुणांनी आळीपाळीने बुद्ध विहाराच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारली. तसेच पोलिसांनाही सूचना देण्यात आली. याप्रकारे सुरक्षेची व्यवस्था झाल्याने तथागत गौतम बुद्धांचा अस्थिकलश सामान्य नागरिकांसाठी बुद्ध पौर्णिमेपासून खुला करण्याचा समितीचा मानस आहे. याची सुरुवात २० मे पासून महापरित्राणपाठ व सुत्तपठणाने केली होईल.(प्रतिनिधी)