नागपूरकर कौशिकी ठरली ‘मिस परफेक्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:49 IST2017-09-15T00:48:56+5:302017-09-15T00:49:10+5:30
‘मिस इंडिया मिस सुपर टॅलेंट सीझन-९’ ही सौंदर्य स्पर्धा बेंगळुरूजवळील दावणगिरे येथे नुकतीच पार पडली.

नागपूरकर कौशिकी ठरली ‘मिस परफेक्ट’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मिस इंडिया मिस सुपर टॅलेंट सीझन-९’ ही सौंदर्य स्पर्धा बेंगळुरूजवळील दावणगिरे येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नागपूरच्या कौशिकी नाशिककर हिने संपूर्ण भारतातून सहभागी झालेल्या १५ स्पर्धकांना मागे टाकत ‘मिस परफेक्ट’ हा अवॉर्ड जिंकला. १८ ते २५ या वयोगटासाठी असलेल्या या स्पर्धेत कौशिकी ही १८ वर्षांची एकमेव स्पर्धक होती. परंतु तिने आपले सौंदर्य व विद्वत्तेच्या बळावर सर्व परीक्षकांना प्रभावित करीत या अवॉर्डवर आपले नाव कोरले. नागपूरकरांसाठी ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. कौशिकी ही दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शाखेच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिचे वडील स्वत: फॅशन कोरिओग्राफर आहेत. ते वर्धा रोडवरील हिंदुस्थान कॉलनीत राहतात. आपल्या मुलींने सौंदर्य स्पर्धेत नाव कमवावे, अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी कौशिकी अडीच वर्षांची असताना तिला पहिल्यांदा रॅम्पवर उतरविले. अडीच वर्षांपासून ते १८ वर्षांपर्यंतच्या या पूर्ण प्रवासात कौशिकीने नागपूर क्वीन, मिस भंडारा, मिस महाराष्ट्र आयकॉन अशा अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले. मिस इंडिया मिस सुपर टॅलेंट या स्पर्धेचे मोठे आव्हान होते. या स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणारी ती एकमेव स्पर्धक होती.
इतर स्पर्धकांच्या तुलनेत तिला फारसे कोचिंग लाभले नव्हते. वडिलांनी दिलेल्या प्रशिक्षणाच्या बळावरच ती या स्पर्धेसाठी सज्ज झाली होती. आपण जिंकायचेच या आत्मविश्वासासह ती स्पर्धेला सामोरी गेली आणि ब्युटी, वॉक, टॅलेंट, जनरल नॉलेज सर्वच आघाड्यांवर प्रशिक्षकांना प्रभावित करीत तिने ‘मिस परफेक्ट’चा मुकुट मिळवला. या यशामुळे तिचा उत्साह द्विगुणित झाला असून, आता मिस फेमिना जिंकण्यासाठी तिने तयारी सुरू केली आहे.