नागपूर शहरातील जुने कामाठी पोलीस ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. संबंधित तरूणाला ऑनलाईने गेग खेळण्याचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो कर्जबाजारी झाला आणि गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला, अशी माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
अनिकेत गणेश ढबाळे (वय, २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत हा आयटीआयमध्ये फिटर ट्रेडचा विद्यार्थी होता. याशिवाय, तो कामठी शहरातील एका प्रतिष्ठित बेकरीमध्ये दररोज काम करायचा. दरम्यान, अनिकेतला ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. या गेममुळे तो कर्जात बुडल्याने मानसिक तणावात होता. दरम्यान, १५ मे रोजी त्याने विषारी उंदीरनाशक प्राशन केले. यानंतर त्याला तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पंरतु, सोमवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली. अनिकेतच्या पश्चात त्याची आई आणि एक भाऊ आहे. अनिकेच्या मृत्युने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने परिसरात खळबळ माजली.