नागपूर : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यामुळे नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने आपत्कालीन उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इतंकार यांनी सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून, त्यांना त्यांच्या मुख्यालयात उपस्थित राहून गरज पडल्यास तात्काळ कार्यवाहीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नियोजन भवनात घेण्यात आलेल्या बैठकीत पोलिस, महापालिका, आरोग्य, आपत्ती प्रतिसाद आणि वन सेवा विभागांच्या प्रमुखांसोबत उच्चस्तरीय समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुख्य निर्देशांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ड्रोन परवानग्या अनिवार्य केल्या आहेत, आरोग्य विभागाकडे विशेष लक्ष देणे आणि आपत्कालीन सेवांसाठी तयार राहण्याचे सांगितले आहेत.
आपत्कालीन आरोग्य सुविधेसाठी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्धता, कार्यरत वैद्यकीय उपकरणे आणि सुरक्षा तयारी सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंघल यांनी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आणि नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि शांतता व सौहार्द राखण्याचे आवाहन केले आहे.
होमगार्ड आणि नागरी संस्थांना आरोग्य आणि सुरक्षा संबंधित कार्यांसाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले तसेच नागरी संस्थांनी पाणी, वीज, अन्नपुरवठा आणि सार्वजनिक रुग्णालयांची कार्यक्षमता सुनिश्चित करण्याची जबाबदारी घेतली आहे.
शहरात इंधन पुरवठा सुरळीत असून, नागरिकांना आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करण्याचे सूचित करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि फक्त अधिकृत सूचनांचेच पालन करण्याचे आवाहन केले आहे.