नागपूर-नांदेड विमानसेवा लवकरच सुरू होणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 2, 2024 10:08 PM2024-04-02T22:08:01+5:302024-04-02T22:08:13+5:30

विमानाच्या उड्डाणासाठी स्टार एअरला मिळाली विमानतळाची वेळ

Nagpur-Nanded flight service will start soon | नागपूर-नांदेड विमानसेवा लवकरच सुरू होणार

नागपूर-नांदेड विमानसेवा लवकरच सुरू होणार

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरूननागपूर-नांदेड विमानसेवा १ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र स्टार एअरने ती तूर्तास पुढे ढकलली असून आता लवकरच सुरू होणार आहे. कंपनीने विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव नागपूर विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) दिला होता. एमआयएलने तो प्रस्ताव दिल्लीतील स्लॉट समन्वय समितीसमोर ठेवला. त्यावर निर्णय होऊन कंपनीला विमानाच्या उड्डाणासाठी वेळ मिळाली आहे.

दोन वर्षांपूर्वी एप्रिलमध्येच उपराजधानीतून पहिले आरसीएस विमान नागपूर ते बेळगाव सुरू झाले. यावर्षी एप्रिलमध्येच नागपूर ते नांदेड विमान सुरू होण्याची शक्यता होती आणि स्टार एअरने एप्रिल-२०२३ पासून नागपूर ते बेळगावसाठी आठवड्यातून दोन दिवस (शनिवार आणि मंगळवार) उड्डाणे सुरू केली होती. एक वर्षानंतर किसनगडपर्यंत मार्ग जोडण्यात आला. नागपूर ते किशनगड आणि बेळगावपर्यंतची उड्डाणे आठवड्यातून चार दिवस उपलब्ध झाली आहेत.

स्टार एअर सध्या बेंगळुरू, हैदराबाद आणि हिंडन (उत्तर प्रदेश) येथून नांदेडसाठी उड्डाणे चालवते. या तीनपैकी कोणताही एक मार्ग नागपूरशी जोडून विमान कंपनी नांदेडला विमानसेवा सुरू करू शकते. कंपनीचकडे एम्बरर-१४५ ही विमाने आहेत. या विमानाची प्रवासी क्षमता ७६ आसनी असून सर्व आरसीएस आहेत. त्यामुळे त्याचे भाडे ३ ते ५ हजारादरम्यान आहेत. नागपूर ते नांदेड विमानसेवा सुरू झाल्यास मराठवाड्यातून बिदरपर्यंतची ही पहिली विमानसेवा असेल.

कंपनीच्या ताफ्यात नऊ विमाने
कंपनी अहमदाबाद, सुरत, कलबुर्गी, जोधपूर, जामनगर, तिरुपती, भूज, मुंबई, कोल्हापूर, जयपूर, हैदराबाद, पुणे, शिवमोग्गा, गोवा, लखनौ, आदमपूर यासह २२ शहरांसाठी उड्डाणांचे संचालन करते. या सेवेसाठी एकूण ९ विमाने आहेत. कंपनी आणखी दोन ते तीन विमानांचा ताफ्यात समावेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर-नांदेड विमानसेवा सुरू होऊ शकते.

Web Title: Nagpur-Nanded flight service will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.