नागपूर : महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना अखेर शहर काँग्रेसने काहीसा दिलासा दिला आहे. उमेदवारी अर्जासोबत पक्षाकडे जमा करायच्या डिपॉझिटमध्ये अडीच हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे सामान्य कार्यकर्ते सुखावले आहेत.
शहर काँग्रेसकडे उमेदवारी अर्ज जमा करताना सर्वसाधारण संवर्गातील इच्छुकांना तब्बल १० हजार रुपये तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच महिला संवर्गातील इच्छुकांना ७,५०० रुपये ‘डिपॉझिट’ म्हणून जमा करायचे आहेत.
ही रक्कम खूप जास्त होत असल्याची ओरड आहे. पक्षाकडे अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांकडूनच एवढी मोठी रक्कम घेतली जात असल्यामुळे कार्यकर्ते नाराज होते. वॉर्डात राबणाऱ्या, आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या गरीब कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरायचाच नाही का, असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व व्यथा लोकमतने मांडत डिपॉझिटची रक्कम कमी करण्याकडे शहर काँग्रेसचे लक्ष वेधले होते. शेवटी लोकमतच्या वृत्ताची शहर काँग्रेसने दखल घेतली.
सोमवारी महापालिका निवडणूक समितीची बैठक प्रधान महासचिव डॉ.गजराज हटेवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तीत डिपॉझिटमध्ये कपात करण्याची घोषणा करण्यात आली. आता सर्वसाधारण संवर्गासाठी ७५०० रुपये,
सर्वसाधारण महिला ५०००, आरक्षित एससीएसटी (सर्वसाधारण) ५००० व आरक्षित एससीएसटी महिला संवर्गासाठी ४ हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे.