लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागून वेगात येणाऱ्या ट्रकने कट मारला आणि चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी नालीत शिरली व दुचाकीवरील तिघेही नालीलगतच्या भिंतीवर आदळले. त्यात आई व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - बुटीबोरी मार्गावरील बुटीबोरीनजीकच्या उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान घडली.लीलाबाई बळीराम पाथोळे (४०) व महेश ऊर्फ सोनू बळीराम पाथोळे (२१) अशी मृत आई व मुलाचे नाव असून, बळीराम पाथोळे (४२) असे जखमी वडिलांचे नाव आहे. पाथोळे दाम्पत्य मूळचे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असून, बळीराम पाथोळे हे बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील खासगी कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने ते मागील काही वर्षांपासून टाकळघाट (ता. हिंगणा) येथे किरायाने राहतात. दरम्यान, तिघेही एमएच-४०/एव्ही-४६७५ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूरहून बुटीबोरी मार्गे टाकळघाट येथे जात होते. बळीराम हे मोटरसायकल चालवित होते.ते बुटीबोरी नजीकच्या उड्डाण पुलाजवळ पोहोचताच नागपूरहून बुटीबोरीकडे वेगात जाणाºया ट्रकने त्यांच्या मोटरसायकलला कट मारला. त्यामुळे बळीराम यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि वेगात असलेली मोटरसायकल लगतच्या नालीत शिरली. शिवाय, तिघेही जोरात जवळच्या सुरक्षा भिंतीवर आदळले. त्यात तिघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. लीलाबाई आणि महेश या आई व मुलाचा काही वेळातच घटनास्थळी मृत्यू झाला. माहिती मिळताच बुटीबोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये रवाना केले. तसेच जखमी बळीराम यांना उपचारार्थ बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. कट मारताच ट्रकचालक ट्रकसह पळून गेला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
नागपूर - वर्धा मार्गावरील उड्डाण पुलाजवळ अपघातात आई व मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:27 IST
मागून वेगात येणाऱ्या ट्रकने कट मारला आणि चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी नालीत शिरली व दुचाकीवरील तिघेही नालीलगतच्या भिंतीवर आदळले. त्यात आई व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - बुटीबोरी मार्गावरील बुटीबोरीनजीकच्या उड्डाण पुलाजवळ शुक्रवारी दुपारी १ ते १.३० वाजताच्या दरम्यान घडली.
नागपूर - वर्धा मार्गावरील उड्डाण पुलाजवळ अपघातात आई व मुलाचा मृत्यू
ठळक मुद्देवडील गंभीर जखमी : ट्रकने कट मारल्याने दुचाकी अनियंत्रित