नागपुरात पावणेसात लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:44 PM2020-07-24T23:44:38+5:302020-07-24T23:46:13+5:30

मागील दीड वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पावणेसात लाखाहून अधिक नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

In Nagpur, more than seven lakh citizens broke traffic rules | नागपुरात पावणेसात लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

नागपुरात पावणेसात लाखांहून अधिक नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

Next
ठळक मुद्देदीड वर्षातील आकडेवारी : रस्ते अपघातांमध्ये ९५ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. मागील दीड वर्षांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे पावणेसात लाखाहून अधिक नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात १ जानेवारी २०१९ ते ३० जून २०२० या कालावधीत किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती हेल्मेट न घालता सापडले, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर किती कारवाई झाली इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१९ ते ३० जून २०२० या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ६ लाख ९१ हजार ८७१ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १७ कोटी ७० लाख ६९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दीड वर्षांच्या कालावधीत नागपूर शहरात रिंग रोड व विविध जंक्शन्सवर ३७९ अपघात झाले व यात ९५ नागरिकांचा बळी गेला. यातील ४० बळी रिंग रोडवरील होते.

हेल्मेट न घालणे पावणेदोन लाख लोकांना भोवले
हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्याप्रकरणी १ लाख ७४ हजार ९१२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिग्नल तोडल्याप्रकरणी ४९ हजार ३४ लोकांवर कारवाई झाली व त्यांच्याकडून ७३ लाख ९४ हजारांचा दंड घेण्यात आला. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाºया ३३ हजार ६१९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांना २३ लाख ७४ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला.

तळीरामांकडून पाच कोटीहून अधिक दंड वसूल
मद्यप्राशन करुन वाहने चालविताना २५ हजार ६९६ वाहनचालक वाहतूक विभागाच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून तब्बल ५ कोटी ४१ लाख ६५ हजार ७९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

रात्रीचे हुल्लडबाज दिसले नाही का ?
आश्चर्याची बाब म्हणजे रात्रीच्या सुमारास हुल्लडबाजी करणारे अनेक तरुण शहरात फिरत असतात. वाहनांवर कसरती करताना ते दिसून येतात. मात्र दीड वर्षांच्या कालावधीत वाहतूक विभागाला अशी एकही व्यक्ती आढळली नाही.

Web Title: In Nagpur, more than seven lakh citizens broke traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.