नागपुरात मेट्रो धावणारच!
By Admin | Updated: July 5, 2014 02:15 IST2014-07-05T02:15:24+5:302014-07-05T02:15:24+5:30
नागपुरात मेट्रो खरंच धावणार का? धावणार तर कधी? काही जण अशा अनेक शंकाकुशंका व्यक्त करीत आहेत.

नागपुरात मेट्रो धावणारच!
नागपूर : नागपुरात मेट्रो खरंच धावणार का? धावणार तर कधी? काही जण अशा अनेक शंकाकुशंका व्यक्त करीत आहेत. परंतु नागपुरात नक्कीच मेट्रो धावणार आहे. त्यावर यापूर्वीच राज्याच्या कॅबिनेटने शिक्कामोर्तब करून केंद्र सरकारनेही तत्त्वत: मंजुरी दिली आहे. केंदाची पूर्ण मंजुरी प्राप्त होताच, पुढील महिनाभरात मेट्रो प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याची ग्वाही नगरविकास, वने, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिली.
ते शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर आले असता, सायंकाळी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सामंत पुढे म्हणाले, मेट्रो प्रकल्पावर एकूण ८ हजार ६८० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५ टक्के नासुप्र, ५ टक्के मनपा, २० टक्के राज्य शासन व २० टक्के केंद्राकडून निधी मिळणार असून, बाकी ५० टक्के रक्कम ही कर्ज स्वरूपात उभारली जाणार असल्याचे ते म्हणाले. शुक्रवारी सामंत यांनी नागपूर सुधार प्रन्याससह महानगरपालिका, क्रीडा विभाग, सामाजिक न्याय व वन विभाग अशा विविध विभागांची स्वतंत्र आढावा बैठक घेऊन विकास कामांची माहिती जाणून घेतली. ‘रामझुला’विषयी बोलताना, या पुलाच्या निर्माणाला विलंब होत असल्याचे त्यांनी मान्य करून, पुढील सप्टेंबरपूर्वी मात्र तो कोणत्याही स्थितीत वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे त्यांनी ठोस आश्वासन दिले. शिवाय गांधीसागर तलावाला आपण प्रत्यक्ष भेट देऊन कुणाच्याही धार्मिक भावना न दुखवता, येथील इतर अतिक्रमण ताबडतोब हटविण्यासंबंधी मनपा प्रशासनाला निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले. येथील सौंदर्यीकरणासाठी २२ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे येथील साफसफाईकडे मनपा प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. शहरात सध्या धावत असलेल्या स्टार बसेसवर त्यांनी तीव्र चिंता व्यक्त करून, या बसेसची फारच वाईट स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ४७० पैकी केवळ २५० बसेस रस्त्यांवर धावत आहेत. बाकी सर्व बंद पडल्या आहेत. त्यामुळे करारानुसार या बसेस धावत नसेल तर तो करारच रद्द करून नवीन कॉन्ट्रॅक्टरचा शोध घ्यावा, अशा मनपा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे ते म्हणाले. शिवाय स्टार बसेसच्या पार्किंग समस्येविषयी बोलताना यासाठी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन करण्यात आली असून, या बसेसच्या पार्किंगसाठी लवकरच मोरभवन येथे जागा दिली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)