नागपूरची मेट्रो विदर्भात जाणार, शंभर मेट्रो रेल्वे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:41+5:302021-03-14T04:07:41+5:30
- युथ एम्पॉवरमेण्ट समिट २०२१चे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात मेट्रोचे काम होणार असून, त्यायोगे ३० हजार ...

नागपूरची मेट्रो विदर्भात जाणार, शंभर मेट्रो रेल्वे धावणार
- युथ एम्पॉवरमेण्ट समिट २०२१चे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात मेट्रोचे काम होणार असून, त्यायोगे ३० हजार रोजगार उत्पन्न होणार आहे. ही मेट्रो ब्रॉडगेज स्वरूपात पूर्ण विदर्भात धावेल. त्यासाठी पहिल्या टप्प्यात ५० व दुसऱ्या टप्प्यात ५० मेट्रो रुळावर धावतील. त्या अनुषंगाने विचार करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
फॉर्च्युन फाउंडेशनच्या वतीने आयोजित युथ एम्पॉवरमेण्ट समिटच्या उद्घाटनाप्रसंगीत गडकरी उद्घाटक म्हणून बोलत हाेते. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सवच पूर्णत: आभासी माध्यमाद्वारे पार पडणार आहे. उद्घाटनही आभासी माध्यमाद्वारेच पार पडले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, फाउंडेशनचे अध्यक्ष माजी आ. अनिल सोले, सल्लागार माजी आ. सुधाकर देशमुख उपस्थित होते.
युथ एम्पॉवरमेण्ट समिट हा चांगला उपक्रम आहे. मात्र, याद्वारे आणखी खोलाज जाऊन विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक गावात दोन उद्योगधंदे उभारता येईल, यादृष्टीने विचार करावा. टाकाऊ गोष्टी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यापासून महत्त्वाच्या वस्तूंची निर्मिती केली जाऊ शकते. जसे चिंध्यापासून गालिचे निर्मितीचा उद्योग पाचगाव मध्ये सुरू केला आहे. स्वस्त आणि आकर्षक असल्याचे त्याची मागणीही वाढली आहे. याचे उद्योग गावागाव न्या. सोलर चरखाद्वारे सुतकताई केली जाईल, तर झोपडपट्टीतील प्रत्येक महिलेला सात-आठ हजार रुपये महिना कमावता येईल. अशा तऱ्हेने दीर्घकालिन रोजगाराचे व्यवस्थापन करावे लागणार आहे. मिहानमध्ये एव्हिएशन संदर्भातील डसॉल्ट, टाल, एअर इंडियाच्या कंपन्या स्थिरस्थावर होऊ लागल्या आहेत. त्या अनुषंगाने तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांची गरज असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाद्वारे समिटसाठी शुभेच्छा दिल्या.
-----------
बॉक्स...
काम कराल तर मत मिळेला
लोकांची कामे कराल, मदत कराल तर तुम्हाला होर्डिंग लावण्याची गरज पडणार नाही. सावजी मटन खा आणि मला मदत द्या, अशी म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. समाजाचे हित साधा, अशा कानपिचक्या यावेळी नितीन गडकरी यांनी नेत्यांना दिल्या.
..............