मातामृत्यू रोखण्यास राज्यात नागपूर मेडिकल ठरतेय ‘मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:08 IST2021-02-14T04:08:34+5:302021-02-14T04:08:34+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, रक्तदाबाशी निगडित समस्या आणि जंतूदोष (सेप्सिस) ही मातामृत्यूची प्रमुख कारणे. नागपूरच्या ...

मातामृत्यू रोखण्यास राज्यात नागपूर मेडिकल ठरतेय ‘मॉडेल’
सुमेध वाघमारे
नागपूर : प्रसूतीनंतर होणारा अतिरक्तस्राव, रक्तदाबाशी निगडित समस्या आणि जंतूदोष (सेप्सिस) ही मातामृत्यूची प्रमुख कारणे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बाहेरून येणाऱ्या विशेषत: अतिरक्तस्रावाचा (पोस्टपार्टम हेमरेज) प्रकरणांमध्ये मातामृत्यूचे प्रमाण जवळपास ९७ टक्के होते. ते कमी करण्यासाठी मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाने पुढाकार घेत ‘क्वाॅलिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ या प्रकल्पांतर्गत ‘रॅपिड रिस्पॉन्स टीम’ तयार केली. यामुळे मागील तीन वर्षात ३३१ पैकी ३१३ मातांना जीवनदान मिळाले. सुरक्षित मातृत्वासाठी या प्रकल्पाला राज्यात ‘मॉडेल’ म्हणून पाहिले जात आहे.
गरीब व सामान्य रुग्णासाठी मेडिकल आशेचे केंद्र ठरले आहे. येथे केवळ विदर्भच नाही तर आजूबाजूच्या चार राज्यातून रुग्ण येतात. यात प्रसूतीनंतर माता गंभीर झाल्यास मेडिकलमध्ये पाठविण्याचे प्रमाण मोठे आहे. २०१७ मध्ये अशा मातांचा मृत्यूचा दर मोठा होता. यावर मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. जे. आय. फिदवी व सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष झरारिया यांनी अभ्यास केला. प्रसूतीनंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे ‘रेफर’ होऊन आलेल्या मातामृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांना आढळून आले. यावर उपाययोजना करण्यासाठी ‘पोस्टपार्टम हॅमरेज’वर काम करणारे ‘एमजीआयएमएस’ रुग्णालय सेवाग्राम वर्धा येथील डॉ. पूनम शिवकुमार यांची मदत घेतली. त्यांच्या सहकार्याने २०१८ मध्ये ‘क्वाॅलिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ प्रकल्प’ हाती घेण्यात आला. ‘इमर्जन्सी क्लिनिकल केअर’, ‘सांघिक कार्य आणि संवाद’, ‘नेटवर्क एकीकरण’ व ‘सुविधा तत्परता’ या चार टप्प्यावर काम करण्यात आले. यामुळे मागील अतिरक्तस्रावामुळे होणाऱ्या मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यात चमूला यश आले.
-तीन वर्षांत ‘पोस्टपार्टम हेमरेज’चे ३३१ रुग्ण
२०१८ ते २०२० या तीन वर्षामध्ये मेडिकलमध्ये ‘पोस्टपार्टम हेमरेज’चे डागा रुग्णालयातून २८ टक्के, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयातून २३ टक्के, प्राथमिक आरोग्य केंद्रातून १८ टक्के, इतर जिल्ह्यातून ९ टक्के, भंडारा जिल्हा रुग्णालयातून १० टक्के, इतर खासगी रुग्णालयातून ८ टक्के तर मध्य प्रदेशातून ४ टक्के रुग्ण आले. २०१८ मध्ये १०८, २०१९ मध्ये ११७ तर २०२० मध्ये १०६ असे एकूण ३३१ माता आल्या. यातील १८ मातांचा मृत्यू तर ३१३ मातांचे प्राण वाचविता आले.
- रक्तदाब व सेप्सिसमुळे मातामृत्यू रोखण्यासाठी प्रकल्प
‘क्वाॅलिटी पीपीएच इमर्जन्सी केअर’ या प्रकल्पात ‘रेफर’ होऊन येत असलेल्या अतिरक्तस्रावाच्या मातांना तातडीने उपचार मिळत असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आता रक्तदाब व जंतूदोषामुळे (सेप्सिस) होणाऱ्या मातामृत्यू रोखण्यासाठी लवकरच नवीन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
-डॉ. आशिष झरारिया
स्त्रीरोग व प्रसूती विभाग, मेडिकल
- मेडिकलमध्ये आलेले ‘पोस्टपार्टम हेमरेज’ रुग्ण
डागा रुग्णालय : २८ टक्के
ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय :२३ टक्के
प्राथमिक आरोग्य केंद्र: १८ टक्के
इतर जिल्हा: ०९ टक्के
भंडारा जिल्हा रुग्णालय : १० टक्के
इतर खासगी रुग्णालय : ०८ टक्के
मध्य प्रदेश ०४ टक्के