नागपुरातील वकील ते राज्याचे महाधिवक्ता!

By Admin | Updated: October 15, 2015 03:16 IST2015-10-15T03:16:09+5:302015-10-15T03:16:09+5:30

ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नेमणूक करण्यात आल्याने नागपूरसह विदर्भाची मान आणखी उंचावली आहे.

Nagpur lawyer advocate for the state! | नागपुरातील वकील ते राज्याचे महाधिवक्ता!

नागपुरातील वकील ते राज्याचे महाधिवक्ता!

श्रीहरी अणेंचा प्रेरणादायी प्रवास : उपराजधानीची उंचावली मान
नागपूर : ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नेमणूक करण्यात आल्याने नागपूरसह विदर्भाची मान आणखी उंचावली आहे. लोकनायक बापूजी अणे यांचा वारसा लाभलेल्या श्रीहरी अणे यांची कारकीर्द नागपुरातूनच सुरू झाली व आपले कायद्याचे ज्ञान, कौशल्य, अ़नुभव यांच्यातून त्यांनी अनेक मैलाचे दगड गाठले.
त्यांना उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण प्रकरणात शासनाची बाजू मांडण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. १९९४ ते १९९७ या कालावधीत हायकोर्ट बार असोसिएशनचे ते अध्यक्षदेखील होते. शिवाय २००० सालापासून ते महाराष्ट्राचे विशेष अधिवक्ता म्हणूनदेखील कार्यरत आहेत.फडणवीस सरकार अल्पमतात असताना त्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर श्रीहरी अणे यांनी बाजू मांडली होती. त्यामुळे ती याचिका रद्द झाली होती. अणे महाराष्ट्र राज्य विधी आयोगाचे सदस्य होते. याशिवाय गांधी सेवा आश्रम समिती, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल लॉ, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, लोकनायक बापूजी अणे एज्युकेशन सोसायटी इत्यादींचे ते सदस्य आहेत. (प्रतिनिधी)
विदर्भासाठी अभिमानाची बाब
अ‍ॅड. श्रीहरी अणे यांची राज्याचे महाधिवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे. ही विदर्भासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. नागपूरसारख्या शहरात प्रॅक्टिस करून राज्याचे महाधिवक्तापदी निवड झालेले अणे हे चौथे वकील आहेत. याचाच अर्थ नागपुरात न्यायालयीन प्रक्रियेत अतिशय चांगले वकील कार्यरत असल्याची ही पुष्टी आहे. महाधिवक्तापदी अतिशय योग्य व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. ते पदाला पूर्ण न्याय देतील. सरकारची बाजू प्रभावीपणे न्यायालयात मांडू शकणारे ते वकील आहेत.
-अ‍ॅड. अनिल किलोर
सामाजिक प्रश्नांची जाण
असलेले व्यक्तिमत्त्व
श्रीहरी अणे अतिशय हुशार आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे शासनाचे कायदेशील सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याने सरकारला निश्चितच फायदा होईल. महाधिवक्ता म्हणून त्यांच्यासारख्याच व्यक्तीची गरज होती. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.
-अ‍ॅड. फिरदोस मिर्झा
अतिशय हुशार
सेनापती मिळाला
राजकीय घडामोडीमुळे सरकारची प्रतिमा खालावली आहे. अशातच न्यायिक प्रक्रियेतील चढउतारामुळे लोकांचा सरकारवरील विश्वास कमी होत आहे. अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या रूपाने सरकारला अतिशय हुशार सेनापती मिळाला आहे. अ‍ॅड. अणे ज्याप्रमाणे कठोर परिश्रम घेणारे आहेत, त्याप्रमाणे सहकारीही हवेत म्हणून सरकारने सेनापती बदलला. त्यामुळे ही निवड स्वागतार्ह आहे.
-अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर
संविधानाची जाण असलेले व्यक्तिमत्त्व
एक विदर्भाचा माणूस एवढ्या मोठ्या पदावर जाणे ही गौरवाची बाब आहे. अनेक वर्षापासून विदर्भातील सर्व समस्यांचे जाणकार म्हणून त्यांची ख्याती आहे. महत्त्वाचे म्हणजे अ‍ॅड. अणेंच्या रूपाने संवैधानिक एक्सपर्ट सरकारला मिळाला आहे. त्यांचा अनुभव आणि बुद्धिमत्तेचा विदर्भालाही फायदा होईल.
-अ‍ॅड. राजेंद्र डागा
बहुआयामी व्यक्तिमत्त्व
अ‍ॅड. अणे वकिली पेशात हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर बार कौन्सिलच्या इतिहासात अणेंचे योगदान मोठे आहे. महाधिवक्ता म्हणून पद मिळालेले बार कौन्सिलचे ते चौथे सदस्य आहेत. सर्वसामान्य माणसाची जाण आणि समाजसेवेचे भान त्यांना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भाचे आंदोलन ते पुढे रेटत आहेत. पण महाधिवक्ता झाल्याने हे आंदोलन मागे पडते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र विदर्भाच्या प्रश्नांबाबत मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.
-अ‍ॅड. अरुण पाटील
सरकारला फायदा होईल
अ‍ॅड. श्रीहरी अणे यांची निवड ही केवळ नागपूरची नव्हे, तर विदर्भ आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढविणारी बाब आहे. त्यांची बुद्धिमत्ता बघता हा निर्णय आधीच व्हायला हवा होता, असे वाटते. वकील म्हणून ते मोठे आहेतच, मात्र माणूस म्हणूनही त्यांचे स्थान मोठे आहे. सध्याचे राज्यातील वातावरण बघता सरकारची भूमिका ते योग्यरीतीने मांडतील, असा विश्वास आहे.
-अ‍ॅड. एस. व्ही. भुतडा

Web Title: Nagpur lawyer advocate for the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.