नागपुरात लंग इन्स्टिट्यूट
By Admin | Updated: March 4, 2017 01:46 IST2017-03-04T01:46:58+5:302017-03-04T01:46:58+5:30
वाढते प्रदूषण व धूम्रपानाच्या सवयीमुळे शहरांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांचा फास आवळत आहे.

नागपुरात लंग इन्स्टिट्यूट
देशातील पहिले : मेडिकलने घेतला पुढाकार, २३ विभागांसह १९५ खाटांचे केंद्र
सुमेध वाघमारे नागपूर
वाढते प्रदूषण व धूम्रपानाच्या सवयीमुळे शहरांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांचा फास आवळत आहे. यातून केवळ अस्थमाच नव्हे तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. याला गंभीरतेने घेत नागपूर मेडिकलने ‘लंग इन्स्टिट्यूट’चा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. यात लहान मुलांच्या श्वसन रोग विभागापासून ते मोठ्यांच्या छातीच्या शस्त्रक्रिया असे २३ विभाग असणार आहेत. देशातील १९५ खाटांचे हे पहिले केंद्र ठरणार आहे.
फुफ्फुसाच्या रुग्णांसाठी आशेचे किरण ठरणार
मेडिकलमध्ये विदर्भासह छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेश येथून रुग्ण येतात. यामुळे हे ‘लंग इन्स्टिट्यूट’ मध्यभारतातील रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. येथे सर्वसमावेशक सेवा तर उपलब्ध होईल सोबतच संशोधनाला प्रोत्साहन देऊन जगात हे संशोधन प्रसिद्ध केले जाणार आहे.
टीबी वॉर्ड परिसरात असणार हे केंद्र
मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात साधारण २५ एकर परिसरात ‘लंग इन्स्टिट्यूट’ प्रस्तावित आहे. यात ६० खाटांचा श्वसन विभाग, ६० खाटांचा क्षयरोग विभाग, १० खाटांचा ‘आॅबस्ट्रॅक्टिव्ह एअरवे डिसीज’, पाच खाटांचा ‘इन्टरस्टीशिअल लंग डिसीज’, पाच खाटांचा निद्रा विकार, पाच खाटांचा इंटरव्हेंशनल पल्मोनरीलॉजी’, १० खाटांचा ‘इन्टरमेडिएट रेस्पीरेटरी केअर युनिट’ २० खाटांचा ‘छाती शस्त्रक्रियेचा विभाग’, तर १० खाटांचा ‘पेडियाट्रीक पल्मोनोलॉजी’ अशा २३ विभागांसह त्याच्या सब विभागांचा समावेश यात असणार आहे.
६०० कोटीचा प्रकल्प
या इन्स्टिट्यूटच्या मंजुरीसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय आरोग्यसेवेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. सुनील खापर्डे यांनी पुढाकार घेतला आहे. याला मंजुरी मिळाल्यास केंद्र शासन साधारण ६०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे. शिवाय १७ प्राध्यापक, २९ सहयोगी प्राध्यापक, ३४ सहायक प्राध्यापक, ३१ वरिष्ठ निवासी डॉक्टर, ६७ कनिष्ठ निवासी डॉक्टर सेवेत असणार आहेत.