मनरेगात नागपूरने मारली बाजी
By Admin | Updated: April 29, 2016 02:57 IST2016-04-29T02:57:25+5:302016-04-29T02:57:25+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) होय.

मनरेगात नागपूरने मारली बाजी
नागपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) होय. या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्याने भरीव काम करीत राज्यात बाजी मारली आहे. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात १,४९,९८२ कुटुंबांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे. १, ४५,७५७ कुटुंबांना जॉबकार्ड मिळाले असून ३३,८५१ कुटुंबाला प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर अनेक कामांमध्ये नागपूर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, हे विशेष.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नागपूर जिल्हा हा मजुरांच्या आधार जोडणीमध्ये राज्यात पहिल्या कमांकावर आहे. जिल्ह्यातील ९९.८० टक्के मजुरांचे आधार क्रमांक काढून नरेगा वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. मनुष्य दिवस निर्मितीमध्ये सुद्धा नागपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. शासनाकडून १४.४५ दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने २४.५९ दिवस रोजगार उपलब्ध करून देत १७० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी ९ टक्के, अनुसूचित जमातीसाठी २९ टक्के आणि महिलांना ४५ टक्के रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मनरेगा अंतर्गत १३६३ सिंचन विहिरी, १६३ पांदण रस्ते, ३७५ सिमेंट रस्ते, ९३,३०० वृक्ष लागवड आणि १५५० वैयक्तिक शौचालयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. २०१५-१६ मध्ये सिंचन विहिरींची ७०० कामांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात १५९९ कामांना सुरुवात झाली. १५ कोटी २३ लाख ९ हजार रुपये खर्च करण्यात आले. २०१५-१६ पूर्वी सुरु करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामापैकी ३७९ कामे या वर्षी पूर्ण करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात प्रथमच ग्रामपंचायत व्यतिरिक्त इतर यंत्रणा उदाहरणार्थ जलसंधारण विभाग, कृषी विभाग इत्यादींना सिंचन विहिरींच्या कामे सोपविण्यात आली हाती.
२०१५-१६ मध्ये १६३ पांदण रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली असून ही सर्व कामे २०१६ च्या पावसाळ्यानंतर पूर्ण करण्यात येतील. सिमेंट रस्त्यांची ३७५ कामे हाती घेऊन ती मार्च महिन्यातच पूर्ण करण्यात आली. सिमेंट रस्त्याच्या कामामुळे ग्रामीण भागात २५ कि.मी.चे लांबीचे रस्ते तयार होऊन स्थायी मालमत्ता निर्माण झाली व ग्रामस्थांना ये-जा करणे सुलभ झाले. नागपूर जिल्ह्यात योजनेच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच अकुशल खर्चाचे प्रमाण १२ टक्क्याने वाढले आहे. सध्या अकुशल व कुशलचे प्रमाणे ६३ व ३७ इतके आहे. (प्रतिनिधी)
मजुरी प्रदानातही प्रथम क्रमांकावर
नागपूर जिल्हा हा मजुरीच्या प्रदानातही राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. विहित मुदतीत मजुरी प्रदानामध्ये नागपूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या ६६.४८ टक्के प्रदाने विहित मुदतीत अदा करण्यात येतात. १०० टक्के प्रदाने विहित मुदतीत करण्याकरिता प्रयत्न केले जात आहे. अंतर्गत कामांच्या ‘असेट मॅपिंग’ आणि जीआयएस मॅपिंगमध्ये सुद्धा नागपूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.