Nagpur has the highest number of atrocities in the state | राज्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे सर्वाधिक गुन्हे नागपुरात

राज्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे सर्वाधिक गुन्हे नागपुरात

योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या नागरिकांवर अत्याचार करणे किंवा सामाजिक प्रतिष्ठेला अवमान करण्याबाबत ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा दाखल करण्यात येतो. समाज आधुनिकतेकडे जात असला तरी जातीपातीचा भेद कायमच असून मागील तीन वर्षांत उपराजधानीमध्ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये दुप्पट गुन्हे दाखल झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे यातदेखील महिला अत्याचाराचेच सर्वात जास्त गुन्हे आहेत.

‘एनसीआरबी’च्या २०१९ सालच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१९ साली नागपुरात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१७ मध्ये हीच संख्या २८ तर २०१८ मध्ये २४ इतकी होती. तीन वर्षांत दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या शहरांत नागपूरचा राज्यात पहिला तर देशात नववा क्रमांक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या तुलनेत नागपुरात जास्त गुन्हे दाखल झाले.

‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये महिला अत्याचाराच्या तब्बल २८ गुन्ह्यांचा समावेश आहे. तर अल्पवयीन मुलींवर अत्याचारासाठी ‘पोक्सो’अंतर्गत दाखल झालेल्या १६ प्रकरणांचा समावेश होता. ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या विविध गुन्ह्यांसाठी दहा महिलांसह एकूण ८५ जणांना अटक झाली. यातील ५५ जणांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली.

शिक्षेचे प्रमाण ठरले शून्य
पोलिसांकडून २०१९ मध्ये एकूण ८८ गुन्ह्यांची चौकशी झाली. यात २०१८ च्या प्रलंबित असलेल्या ३३ प्रकरणांचा समावेश होता. न्यायालयात ‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत ३६ खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालीन दाखल अशा १६४ खटल्यांवर सुनावणी झाली. यात एकालाही शिक्षा झाली नाही तर ३३ प्रकरणांत ७७ जणांची निर्दोष मुक्तता झाली.

राज्यातील गुन्हे
शहर              - गुन्हे


नागपूर            - ५६
मुंबई               - ५३

पुणे                 - ३६

 

 

Web Title: Nagpur has the highest number of atrocities in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.