नागपुरात एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचपट मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST2021-05-25T04:07:44+5:302021-05-25T04:07:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर ...

Nagpur has five times more deaths in April than last year | नागपुरात एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचपट मृत्यू

नागपुरात एप्रिलमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाचपट मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहनघाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीच्या जवळपास पाचपट अंत्यसंस्कार शहरातील घाटावर करण्यात आले आहेत.

एप्रिल महिन्यात नागपूर शहरात कोरोनामुळे १,२०३ लोकांचा मृत्यू झाल्याची मनपाकडे नोंद आहे. परंतु शहरातील १४ घाटांवर तब्बल ७,५०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर एप्रिल २०२० मध्ये शहरातील दहनघाटावर १,५२७ अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल महिन्यात ५,९७३ अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

दर महिन्याला नागपूर शहरातील घाटावर सरासरी १,५०० ते १,६०० अंत्यसंस्कार केले जातात. मात्र एप्रिल २०२१ मध्ये कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असताना तब्बल ७,५०० अंत्यसंस्कार करण्यात आले. दर महिन्याची अंत्यसंस्काराची सरासरी विचारात घेतली तर एप्रिल महिन्यात अंत्यसंस्काराचा उच्चांक होता. मात्र मनपाकडे कोविडमुळे १,२०३ मृत्यूची नोंद आहे. परंतु दर महिन्याला नैसर्गिक व आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची १,५०० ते १,६०० आहे. ४,७७० मृत्यू कोविड की नॉन कोविड, असा प्रश्न कायम आहे.

१५ दिवसात चार हजाराहून अधिक अंत्यसंस्कार

कोरोना प्रकोपामुळे शहरात दररोज २५० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. यात रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूसोबतच गृहविलगीकरणात असलेल्यांचाही समावेश होता. एप्रिलच्या १५ दिवसात चार हजाराहून अधिक अंत्यसंस्कार करण्यात आले. गृहविलगीकरणातील असलेल्यांची नोंद होत नसल्याने त्यांचा कोविड मृत्यूत समावेश होत नसल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तसेच नागपुरातील रुग्णालयात परप्रांतीय व बाहेरील जिल्ह्यातील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्याची नोंद होत नसल्याने मृतांचा आकडा अधिक असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

चार प्रमुख घाटावर ५,२३५ अंत्यसंस्कार

एप्रिल महिन्यात शहरातील १४ घाटावर ७,५०० अंत्यसंस्कार करण्यात आले. यातील ५,२३५ अंत्यसंस्कार चार घाटावर करण्यात आले. यात सर्वाधिक १,६५९ अंत्यसंस्कार गंगाबाई घाटावर करण्यात आले. मोक्षधाम घाटावर १,४१२, मानेवाडा घाटावर १,१०० तर अंबाझरी घाटावर १,०६४ अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्य १० घाटावर २,२६५ अंत्यसंस्कार करण्यात आले. यात दिघारी-वाठोडा, शांतिनगर, सहकारनगर, वैशालीनगर, मानकापूर, नारा, भरतवाडा, पुनापूर, पारडी आदी घाटांचा समावेश आहे.

....

....................

एप्रिल महिन्यात प्रमुख घाटावरील अंत्यविधी

घाट अंत्यविधी

सहकारनगर ३६५

मानेवाडा १,१००

मोक्षधाम १,४१२

अंबाझरी घाट १,०५४

दिघोरी-वाठोडा ७०३

गंगाबाई १,६५९

शांतिनगर २००

Web Title: Nagpur has five times more deaths in April than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.