नागपूरला वेस्ट व्यवस्थापनात फाईव्ह स्टार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST2021-06-27T04:06:43+5:302021-06-27T04:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. २५) स्मार्ट सिटी पुरस्कार २०२०, ...

नागपूरला वेस्ट व्यवस्थापनात फाईव्ह स्टार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे शुक्रवारी (दि. २५) स्मार्ट सिटी पुरस्कार २०२०, हवामान स्मार्ट सिटी असेसमेंट फ्रेमवर्क (सीएससीएएफ) २.० आणि डेटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्क (डीएमएएफ), आदींचे निकाल जाहीर करण्यात आले. डेटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्क या कॅटेगरीत नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएसएससीडीसीएल) १०० शहरांमध्ये पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तसेच क्लायमेट असेसमेंट फ्रेमवर्कच्या मानकांमध्ये १५६० - २८०० गुणांसह थ्री स्टार गुण प्राप्त झाले, तर वेस्ट व्यवस्थापनासाठी फाईव्ह स्टार गुणांक मिळाल्याची माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिली.
स्मार्ट सिटी पुरस्कार सामाजिक बाबींच्या विषयांवर देण्यात आला. यामध्ये शासन, संस्कृती, नागरी पर्यावरण, स्वच्छता, अर्थव्यवस्था, अंगभूत पर्यावरण, पाणी आणि शहरी गतिशीलता या बाबींचा समावेश होता. वेस्ट व्यवस्थापनाच्या थीमवर नागपूरच्या कामगिरीचीही नोंद घेतली आहे. ओला कचरा प्रक्रियेचा विस्तार या थीम अंतर्गत शहराच्या तयारी अहवालात विशेष उल्लेख केला आहे. शहरी नियोजन - हरित आवरण आणि जैवविविधता, ऊर्जा आणि ग्रीन इमारत, गतिशीलता आणि हवेची गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन आणि वेस्ट व्यवस्थापन या पाच हवामान संबंधित मापदंडांवर मूल्यांकन करण्यात आले आहे. यासोबत डेटा मॅच्युरिटी असेसमेंट फ्रेमवर्कचे निकालही जाहीर करण्यात आले. या मूल्यांकनात १०० स्मार्ट सिटीजमध्ये नागपूर शहर पाचव्या क्रमांकावर असल्याचे भुवनेश्वरी एस. यांनी सांगितले.