नागपूर - गेल्या आठवड्यात नागपुरात ३ टक्के जीएसटीसह दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ८९,१९८ रुपये आणि किलो चांदीची किंमत एक लाख रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला वाढती मागणी आणि लोकांची सोन्यात गुंतवणूक वाढल्यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
बाजार बंद होताना शनिवार, २२ रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोने जीएसटीविना ८६,६०० रुपये आणि चांदीचे दर ९७,२०० रुपयांवर स्थिरावले. ३ टक्के जीएसटी अर्थात २,५९८ रुपयांच्या वाढीसह नागपुरात सराफांकडे सोन्याचे भाव ८९,१९८ रुपये आणि चांदीवर २,९१६ रुपये जीएसट आकारून किलो चांदीची १,००,११६ रुपये भावाने विक्री झाली. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
गेल्या आठवड्यात जीएसटीविना सोने १,५०० आणि चांदीचे भाव ७०० रुपयांनी वाढले. शनिवार, १५ फेब्रुवारीच्या तुलनेत सोमवार, १७ रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ झाली. मंगळवार, १८ रोजी ६०० रुपये, बुधवार, १९ रोजी ७०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ८६,८०० रुपयांवर गेली. गुरुवार, २० रोजी भाव स्थिर होते. मात्र, शुक्रवार, २१ रोजी सोने ५०० रुपयांनी घसरले. शनिवार बाजार बंद होताना भाव ३०० रुपयांची वाढून जीएसटीविना ८६,६०० रुपयांवर पोहोचले.