रिफायनरी स्थापनेसाठी नागपूर अनुकूल वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:35+5:302021-01-17T04:09:35+5:30

नागपूर : रिफायनरी आणि पेट्रोलियम कॉम्प्लेक्स अर्थात रिफायनरी उद्योग सुरू करण्यासाठी विदर्भातील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती आणि अनुकूल ठिकाण ...

Nagpur favorable environment for refinery establishment | रिफायनरी स्थापनेसाठी नागपूर अनुकूल वातावरण

रिफायनरी स्थापनेसाठी नागपूर अनुकूल वातावरण

नागपूर : रिफायनरी आणि पेट्रोलियम कॉम्प्लेक्स अर्थात रिफायनरी उद्योग सुरू करण्यासाठी विदर्भातील नागपूर हे देशाचे मध्यवर्ती आणि अनुकूल ठिकाण आहे. नागपुरातून पेट्रोलियम उत्पादनाचा पुरवठा देशाच्या कानाकोपऱ्यात करता येऊ शकतो. रिफायनरी व पेट्रोलियम कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात यावा, अशी विनंती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विदर्भ एकॉनॉमिक विकास संस्थेच्या (वेद) पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रिफायनरी आणि पेट्रोलियम कॉम्प्लेक्ससंदर्भात सादरीकरण केले होते. त्यांनी फडणवीस यांच्याकडे रिफायनरी स्थापन करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनी वेदच्या सादरीकरणाची कॉपी पाठवून विदर्भाचा कायापालट करणारी रिफायनरी स्थापन करा, अशी मागणी धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली आहे. आता पेट्रोलियम मंत्री यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. ‘वेद’चे अध्यक्ष शिवकुमार राव, उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी, कोषाध्यक्ष नवीन मालेवार यांनी गेल्या आठवड्यात सादरीकरणाद्वारे कॉम्प्लेक्स उभारण्याची मागणी केली होती, हे विशेष. गेल्या आठ वर्षांपासून 'वेद'चे प्रयत्न चालले आहेत. नागपुरात इंधनाच्या किमती देशात सर्वाधिक असून त्यामुळे विदर्भ विकासाला मोठा फटका बसत आहे. रिफायनरीमुळे ६० पेक्षा जास्त पेट्रोलियम उत्पादनांची निर्मिती होणार असून त्यावर आधारित अनेक उद्योग सुरू होतील, असा वेदचा दावा आहे.

नागपूरसह विदर्भात इंधनाचे दर सर्वाधिक असल्याने मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प विदर्भात येत नाहीत. रिफायनरी आणि पेट्रोलियम कॉम्प्लेक्स स्थापन झाल्यास अन्य मोठे उद्योग विदर्भात येतील आणि विदर्भाचा विकास आणि रोजगारांच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे प्रदीप माहेश्वरी यांनी सांगितले. आपण वेळ दिल्यास वेदची तज्ज्ञ मंडळी प्रकल्पाबाबत सादरीकरण करतील, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Nagpur favorable environment for refinery establishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.