- नरेश डोंगरे नागपूर - त्याचे मूड स्विंग झाल्यास सुमधुर तरंग उठतात अन् कानावर पडणाऱ्याच्या मनाला त्या स्वरलहरी एक अनामिक सुकून देऊन जातात. संगीताच्या या जादुगराची करामत तब्बल १०९ वर्षांपासून सुरू आहे.
भारतावर गुलामगिरी लादणाऱ्या इंग्रजांपैकी बहुतांश गोरे क्रूर होते, जुलमी होते. मात्र, कलासक्तही होते अशातीलच एका गोऱ्या अधिकाऱ्याने आपले आणि साथीदारांचे मनोरंजन करण्यासाठी, त्यांची तत्कालीन मैफल सुमधुर करण्यासाठी लंडनच्या कोलार्ड अँड कोलार्ड कंपनीकडून एक शानदार पियानो बनवून घेतला. नागपूरच्या सीनियर इन्स्टिट्यूट ऑफ गार्ड लाईनमध्ये 1916 पासून या पियानोच्या स्वरलहरींनी गोऱ्या साहेबांपासून तो भारतीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांच्या जीवनात आनंद तरंग उठवू लागल्या. १९५० ला गोरे भारत सोडून गेले. मात्र, त्यांचा पियानो येथेच राहिला. तब्बल ७९ वर्षांची प्रदीर्घ सेवा दिल्यानंतर अंतरिक बिघाडामुळे त्याचे सूर बदलले. परिणामी १९९५ मध्ये तो शांत झाला.
आत्मिक शांती देणारा पियानो शांत झाल्यामुळे येथील काही अधिकारी अस्वस्थ झाले. त्यांनी संगीत तज्ञांच्या मदतीने त्याला पुन्हा नवा स्वरसाज चढविला आणि 1912 पासूनपियानोची आफ्टर रिटायरमेंट अर्थात बोनस सर्विस सुरू झाली. डीआरएम बिल्डिंगच्या जिन्याजवळ त्याच्यासाठी एक खास जागा निश्चित करण्यात आली तेथे त्याला स्थापित करून त्याची ऑटोमॅटिक सेवा घेणे सुरू झाले.
आता व्हीआयपी, व्हीव्हीआयपी आणि विशिष्ट अधिकारी आले की इलेक्ट्रिक बोर्डमध्ये प्लग लावून त्याला सुरू केले जाते. 109 वर्षे वयाचा हा पियानो आजही आपल्या जादुई स्वलहरींनी ऐकणाऱ्याच्या काना मनाला तृप्त करतो, मंत्रमुग्ध करतो.