लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : वडिलांना ब्लॅकमेल करीत पैसे मागण्याच्या उद्देशाने तिघांनी अल्पवयीन मुलाचे आधी अपहरण केले. तिघेही त्याच्या वडिलांचे मित्र आहेत. त्यांनी त्याची कारमध्ये गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह पोत्यात बांधून चनकापूर (ता. सावनेर) शिवारातील झुडपात फेकून दिला. संशयाच्या आधारावर पोलिसांनी वडिलांच्या एका मित्रास ताब्यात घेतले आणि हत्येचे बिंग फुटले. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. १५) रात्री घडली असून, बुधवारी (दि. १७) सकाळी उघडकीस आली.
जितू युवराज सोनेकर (११, रा. वॉर्ड क्रमांक २, खापरखेडा, ता. सावनेर) असे मृत मुलाचे नाव असून, राहुल पाल, यश वर्मा व अरुण भारती (तिघेही रा. चनकापूर, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघेही जितूच्या वडिलांचे मित्र होत. जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात इयत्ता सहावीत शिकायचा. तो सोमवारी सकाळी शाळेत गेला; पण, सायंकाळी घरी परत आला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.
शिवाय, तो बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रारही नोंदविली. दरम्यान, बुधवारी सकाळी चनकापूर येथील वेकोलि कॉलनीलगतच्या झुडपात बकऱ्या चारणाऱ्याला त्याचा मृतदेह आढळून आला. डोके व डोळ्याला असलेल्या जखमा व रक्तस्त्रावामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. जितू शाळेत बसने ये-जा करायचा. त्याच्याकडे बसचा पासदेखील आहे. मात्र, तो सोमवारी सायंकाळी बसने घरी येण्याऐवजी पायी निघाला. तो पांढऱ्या कारमध्ये बसून गेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी देताच आईची शंका राहुलवर गेली. विशेष म्हणजे, तो जितूच्या वडिलांसोबत त्याचा शोध घेत फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली देत दोघांची नावे सांगितली. त्यामुळे खापरखेडा पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवित तपास सुरू केला. हा गुन्हा ठाणेदार हरीश रुमकर यांच्या मार्गदर्शनात खापरखेडा पोलिस व झोन-५च्या गुन्हे शाखेचे उघड केला.
कारमध्ये आवळला गळा अन् मृतदेह पोत्यात टाकला
जितू आरोपी राहुल पालला ओळखायचा. वडिलांकडे जायचे असल्याने तो सोमवारी सायंकाळी राहुलसोबत एमएच ४०- ए ७२२७ क्रमांकाच्या कारमध्ये बसला, या कारमध्ये बसताना जितूच्या तीन मित्रांनी बघितले होते. राहुल, यश व अरुणने त्याला अण्णामोड, कोराडी मंदिर रोड, बारेगाव, भानेगाव, बिना संगम मार्गे पारशिवनीच्या दिशेने नेले आणि परत पोटा, चनकापूरच्या दिशेने आणले. त्यानंतर रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान एबी इन्कलाइल कोळसा खाण मार्गावर त्याची कारमध्येच गळा आवळून हत्या केली व मृतदेह पोत्यात टाकला.
शेतीच्या पैशावर डोळा
जितूचे आई-वडील वेगवेगळे राहतात. आई खापरखेडा येथे तिच्या आईकडे तर वडील चनकापूर येथे राहतात. तो आईकडे राहत असला तरी त्याला वडिलांकडे राहायचे होते. त्याचे वडील भाजीपाला विकत असले तरी त्यांची पांढुर्णा (मध्य प्रदेश) येथे शेती आहे. त्या शेतीच्या व्यवहारातून त्यांना काही रक्कम मिळाली होती तर मोठी रक्कम मिळणार होती. या सर्व बाबी राहुलला माहीत होत्या. जितूचे अपहरण करून त्याच्या वडिलांना पाच लाख रुपये मागण्याची त्याने योजना आखली आणि जितूचे अपहरण केले. रात्री तो कारमध्ये चिडचिड करीत असल्याने त्यांनी त्याची हत्या केली.
वेकोलि क्वॉर्टरमध्ये ठेवला मृतदेह
राहुलने वेकोलिच्या चनकापूर येथील एका क्वॉर्टरवर अवैधरीत्या कब्जा केला आहे. या तिघांनी जितूचा मृतदेह पोत्यात भरून त्या क्वॉर्टरमध्ये ठेवला होता. दुर्गंधी येत असल्याने त्यांनी मृतदेह झुडपात फेकला आणि पोते जवळच्या रेतीच्या ढिगाऱ्यात दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपींकडून कार, क्वॉर्टरमधून स्कूल बॅग आणि रेतीच्या ढिगाऱ्यातून पोते जप्त केले.