नागपुरात ‘केबल ड्रम’ चोरणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:32 IST2018-04-01T00:31:43+5:302018-04-01T00:32:05+5:30
सदर परिसरातील रेसिडेन्सी रोड, मानकापूर आणि गिट्टीखदान रोडवरील लाखो रुपयाचे केबल ड्रम चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली.

नागपुरात ‘केबल ड्रम’ चोरणारी टोळी अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर परिसरातील रेसिडेन्सी रोड, मानकापूर आणि गिट्टीखदान रोडवरील लाखो रुपयाचे केबल ड्रम चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली. संदीप विक्टर लाल (४०) रा. छिंदवाडा, जामई, मो. आरिफ अन्सारी आणि लियाकत अली ऊर्फ सद्दाम अफजल अन्सारी (२८) रा. ताजनगर टेका अशी आरोपीची नावे आहे.
सदर येथील स्मृती टॉकीजसमोर फूटपाथवर ९ मार्च रोजी ५ लाख ३६ हजार रुपये किमतीचे ११ केव्हीचे आर्म्ड केबलचा ड्रम चोरीला गेला होता. फिर्यादी रोशन ब्राह्मणकर यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदरचे एपीआय अर्जुन घोडेपाटील यांच्या नेतृत्वातील डीबी चमूने या प्रकरणाचा शोध घेत असताना स्मृती टॉकीज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले. तेव्हा पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ९ मार्च रोजी रात्री ८ वाजता क्रेनच्या मदतीने ेएका ट्रकमध्ये केबल ड्रम ठेवले जात असल्याचे आढळून आले. यानंतर संबंधित ट्रक लेडीज क्लबजवळ दिसून आला. ट्रक क्रमांकाच्या आधारावर पोलीस एमआयडीसी परिसरात ट्रक व क्रेन भाड्याने देणारे व्यावसायिक विनोद यांच्यापर्यंत पोहोचले. व्यापारी विनोद यांनी जतीन वर्मा नावाच्या एका इंजिनियरला मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी कार, ट्रक व क्रेन भाड्याने दिल्याचे सांगितले. यानंतर ट्रक चालकाला विचारपूस केली असता केबलचे ड्रम ताजनगर टेका येथील कबाडी व्यापरी राशिद ऊर्फ मोनू अहमद नसीमुद्दीन मलीक (२७) याच्या गोदामात उतरविल्याचे सांगितले. कबाडी व्यापाऱ्याने केबल आरोपीकडून खरेदी केल्याचे सांगितले.
- बॉक्स..
क्रेनसह ४८ लाखाचे साहित्य जप्त
पोलिसांनी छिंदवाडा येथील आरोपी संदीप लाल आणि मो. आरीफला २२ मार्चला अटक केली. यानंतर पाचपावली ताजनगर येथील लियाकत अलीला अटक करण्यात आली. आरोपींनी सदर शिवाय गिट्टीखदान आणि मानकापूर परिसरातूनही केबल व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून केबल, रबरचे ट्यूब, इलेक्ट्रिक कटर, आणि ग्लँडर मशीन, मोबाईल, क्रेन (क्र. एमएच/३१/सीव्ही/५५२५), दहा चाकी ट्रक (एमएच/४०/३०७८) कार (एमपी/२८/सीए/६८९५)सह अॅल्युमिनिअम तार आदी ४८ लाखापेक्षा अधिक किमतीचे साहित्य जप्त केले.