नांदेडहून आणलेल्या पाेपटाच्या पिलांना नागपूरची ऊब ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:08 IST2020-12-25T04:08:08+5:302020-12-25T04:08:08+5:30
नागपूर : पाेपटाची तब्बल १९ पिले सध्या वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये देखरेखीत ठेवण्यात आली आहेत. त्यांना नांदेडहून येथे आणण्यात ...

नांदेडहून आणलेल्या पाेपटाच्या पिलांना नागपूरची ऊब ()
नागपूर : पाेपटाची तब्बल १९ पिले सध्या वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये देखरेखीत ठेवण्यात आली आहेत. त्यांना नांदेडहून येथे आणण्यात आले आहे. शरीर गाेठविणाऱ्या कडाक्याच्या थंडीत तस्करांच्या निर्दयीपणामुळे आइच्या पंखांची ऊब त्यांनी गमावली आहे. सेंटरमध्ये देखरेख करताना ती माया देण्याचे काम सेंटरचे डाॅक्टर व कर्मचारी करीत आहेत.
नांदेड वनविभागाने तस्करी हाेत असलेले पाेपटांचे पिले १६ डिसेंबरला आराेपींकडून जप्त केले हाेते. १९७२ च्या वन्यजीव संवर्धन कायद्यानुसार आराेपींना अटक करण्यात आली. नांदेड वनविभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो, भारत सरकार यांनी ही कारवाई केली. मात्र आईपासून दुरावलेल्या या पिलांना थंडीच्या दिवसात कसे जगवायचे, हा प्रश्न वनविभागासमाेर हाेता. त्यावर न्यायालयाने या पिलांच्या देखरेखीचा उपाय सुचविला. न्यायालयाच्या निर्देशानुसार नांदेडचे मानद वन्यजीव रक्षक अतींद्र कट्टी आणि संबंधित वनविभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी २१ डिसेंबरला हे सर्व पिले नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणली. यामध्ये ६ पिले एकदमच नवजात, ११ थाेडी माेठी तर २ पूर्ण वाढ झालेली आहेत. त्या सर्वांना माेठे करणे एक आव्हान आहे. सध्या त्यांना विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले आहे व थंडीमध्ये तापमान नियंत्रित राहावे म्हणून इनक्युबेटरची व्यवस्थाही केली आहे. पूर्ण प्रयत्न करून या सर्व पिलांना त्यांच्या अधिवासात मुक्त करण्यात येईल, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक कुंदन हाते यांनी दिली. पक्षिप्रेमींनी या पिलांच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केली.