नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 09:57 PM2019-06-28T21:57:48+5:302019-06-28T21:58:50+5:30

झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींगच्या घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन करून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

In Nagpur The anger expressed by the Muslim community against Mob lynching | नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष 

नागपुरात मॉब लिंचींगवर मुस्लिम समाजाने व्यक्त केला रोष 

Next
ठळक मुद्देसंविधान चौकात आंदोलन : झारखंडच्या घटनेतील दोषींविरुद्ध कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : झारखंडमध्ये झालेल्या मॉब लिंचींगच्या घटनेविरुद्ध मुस्लिम समाजातील नागरिकांनी शुक्रवारी संविधान चौकात तीव्र आंदोलन करून या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
झारखंडमध्ये जमावाने मुस्लिम युवक तबरेज अन्सारीला बांधून रात्रभर लाठ्यांनी मारहाण केली. त्याला जबरदस्तीने जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले. त्यानंतर रुग्णालयात तबरेजचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात याविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. नागपुरातही मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी मॉब लिंचींगच्या वाढत्या घटनांबाबत शासनातर्फे चुप्पी साधण्यात येत असल्याबाबत विरोध दर्शविला. यावेळी मुफ्ती मोहम्मद फारुख म्हणाले, झारखंडसह अनेक राज्यात मॉब लिंचींग करण्यात येत असल्यामुळे मुस्लिमांचा जीव जात आहे. धर्माच्या नावाने आतंकवाद वाढत आहे. परंतु शासन या विरुद्ध ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. मॉब लिंचींगच्या घटना थांबविण्यासाठी कायदा तयार करण्याची गरज आहे. परंतु शासन या निंदनीय घटनेचा निषेध करून उपाययोजना करण्यावरही बोलत नाही. यामुळे भारतीय जनता पक्ष मॉब लिंचींगच्या घटनांना पाठिंबा देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी मॉब लिंचींगवर अंकुश लावण्यासाठी पुढाकार घेतला तरच ते सर्वांचा विश्वास जिंकू शकतील, असे त्यांनी सांगितले. मुस्लिम समाज अशी गुंडागर्दी सहन करणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. डॉ. अनवर सिद्धीकी यांनी मॉब लिंचींगच्या घटनेचा निषेध करून शासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. निदर्शने आंदोलनात मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन, वेलफेअर पार्टी ऑफ इंडिया, भारिप बहुजन महासंघ, एमपीजे, दक्षिणायन संघटना, इंडियन युनियन मुस्लिम लीग, जमियत उलेमा हिंद या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामाजिक, राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने मॉब लिंचींग करून तबरेजचा खून करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यावेळी एमआयएमचे शहर अध्यक्ष नौशाद अली हैदरी, मो. जावेद निलो, मो. आरिफ गौरी, मो. इरशाद शेरु, जमात इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष डॉ. अनवर सिद्धीकी, शफिक अहमद, एमपीजे नागपूरचे जिल्हाध्यक्ष कबीरुद्धीन खान, दक्षिणायनच्या प्रज्वला कट्टे, रुबीना पटेल, एमपीजेचे अध्यक्ष शकील मोहम्मदी आदी संघटनांचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: In Nagpur The anger expressed by the Muslim community against Mob lynching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.