नागपूरही हादरले

By Admin | Updated: April 26, 2015 02:15 IST2015-04-26T02:15:47+5:302015-04-26T02:15:47+5:30

सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी दिवसभर भयग्रस्त वातावरण होते. भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी नागपूरकर पुरते हादरले होते.

Nagpur also shook | नागपूरही हादरले

नागपूरही हादरले

नागपूर : नेपाळसह, उत्तर भारतात शनिवारी सकाळी ७.५ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले असतानाच नागपुरातही सकाळी ११.३० ते दुपारी ११.५० च्या दरम्यान पाच ते दहा सेकंदाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उत्तर, दक्षिण व पश्चिम नागपुरात याचा प्रभाव अधिक जाणवला. काही ठिकाणी घरातील भांडी पडली, फर्निचर हलले, खिडक्यांच्या काचांना तडा गेली. एकाएक इमारत हलत असल्याचे जाणवताच नागरिक घाबरून घराबाहेर पडले. सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी दिवसभर भयग्रस्त वातावरण होते. भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी नागपूरकर पुरते हादरले होते.

भूकंपाची अधिकृत नोंद नाही
नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाचे धक्के नागपूरमध्येही बसले, अशी चर्चा दिवसभर शहरात असली तरी त्याची अधिकृत नोंद नाही, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान ही अफवाच होती, असे सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनातर्फे नागपूरचा हवामान विभाग, जीएसआय (जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया)आणि दिल्लीतील एनडीआरएम (राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि बचाव व्यवस्थापन ) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर नागपूरमध्ये कुठेही भूकंपाचे धक्के बसले नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले. उत्तर प्रदेश,बिाहर आणि गुजरात वगळता इतर राज्यात धक्के बसले नाहीत, असे एनडीआरएमकडून सांगण्यात आले,असे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांनी स्पष्ट केले.
भूकंपाच्या दृष्टीने नागपूर अत्यंत सुरक्षित शहर समजले जाते. शहरात भूकंपाचे सर्वाधिक धक्के उत्तर नागपुरात बसले. शनिवारी दुपारी ११.३० ते ११. ५० च्या सुमारास शहरातील अनेक भागांमधील नागरिकांना विशेषत: फ्लॅटधारकांना भूकंपाचे धक्के जाणवले. कुणी सोफ्यावर तर कुणी पलंगावर बसून टीव्ही पाहत असताना अचानक सोफा हलत असल्याचे जाणवले. महिलांना स्वयंपाक करीत असताना भांड्याची रॅक हलली. काही वेळ कुणालाच काही समजले नाही. परंतु इतर लोकांनाही तसाच अनुभव आल्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याचे लक्षात आले आणि तारांबळ उडाली. धावपळ करीत सर्व आपापल्या इमारती खाली उतरले. एक-दोन मिनिटांत ३ ते ४ वेळा धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. नागपुरातील हनुमाननगर, नेहरूनगर, सक्करदरा, भांडेप्लॉट, रामदासपेठ, पार्वतीनगर, जाफरनगर, तुकडोजीनगर, मानेवाडा, सदगुरुनगर, मानकापूर, जरीपटका, अनंतनगर, सदर या भागात सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याचे त्या-त्या भागातील नागरिकांनी सांगितले. लोकमतच्या चमूने दुपारी १२ ते दुपारी ३ वाजतापर्यंत शहरातील विविध भागातील नागरिकांशी संपर्क साधला असता अनेकांनी या सौम्य धक्क्याची माहिती दिली.

Web Title: Nagpur also shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.