नागपूर - सन २०१९ पासून बंद पडलेला ६०० मेगावॅट क्षमतेचा बुटीबोरी येथील वीज प्रकल्प लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. रिलायन्स पॉवरची उपकंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (व्हीआयपीएल) विकत घेण्याच्या अदानी पॉवरच्या योजनेला कर्जदारांच्या समितीकडून (सीओसी) मान्यता मिळाली आहे.
या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज मुंबईतील अदानीच्या वीज वितरण क्षेत्रात पुरवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अदानी पॉवर हा प्रकल्प ताब्यात घेण्याची योजना आखत असल्याचे वृत्त लोकमतने आधीच प्रकाशित केले आहे. अदानी पॉवर रिलायन्स पॉवरचा बुटीबोरी येथील प्रकल्प खरेदी करण्यासाठी चर्चेत होती. पूर्वीच्या वृत्तानुसार या कराराची किंमत २,४०० कोटी ते ३ हजार कोटीदरम्यान असण्याचा अंदाज होता. सप्टेंबर २०२४ मध्ये रिलायन्स पॉवरने व्हीआयपीएलचे हमीदार म्हणून एकूण ३,८७२ कोटी रुपये देऊन त्याचे पेमेंट दायित्व पूर्ण केले होते.
अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपच्या (एडीएजी) मालकीचा रिलायन्स पॉवर प्रकल्प हा ‘कॅप्टिव्ह पॉवर’ म्हणून नियोजित होता. परंतु, नंतर त्यांनी मुंबईतील रिलायन्सच्या वीज वितरण क्षेत्रात वीज पुरवठा सुरू केला. तथापि, अदानींनी हा व्यवसाय ताब्यात घेतल्यावर त्यांनी बुटीबोरी प्रकल्पातून वीज खरेदी बंद केली. त्यामुळे २०१९ मध्ये प्रकल्प बंद झाला आणि सुमारे ५०० कर्मचारी बेरोजगार झाले.
अदानी पॉवर प्रकल्प सुरू झाल्यावर आपल्याला परत घेतले जाईल, अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. प्रकल्प बंद झाल्यानंतर अनेकांनी दुसऱ्या नोकऱ्या शोधल्या. परंतु काहींना अजूनही अडचणी येत आहे. कर्जदारांच्या समितीने अधिग्रहणाला हिरवा कंदील दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.