नागपुरात मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 22:29 IST2017-11-18T22:23:18+5:302017-11-18T22:29:23+5:30
नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

नागपुरात मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे कारावास
आॅनलाईन लोकमत
नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाचे न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून २ हजार रुपये पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.
सोनू सुरेश यादव (२२) रा. हिवरीनगर झोपडपट्टी, असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी २५ नोव्हेंबर २०१३ रोजी भादंविच्या ३५४-डी, ५०४, ५०६-बी आणि लैंगिक अपराधांपासून बाल संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
खटल्याची पार्श्वभूमी अशी की, गुन्हा दाखल होण्याच्या एक महिन्यापूर्वीपासून आरोपी हा पीडित मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. तो तिला टॉन्टिंग करायचा. तू मला खूप आवडते, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे तो म्हणायचा. ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आरोपीने पीडित मुलीच्या आईसोबत मोबाईलवर संपर्क साधला होता. तिने त्याची समजूत काढली होती.
२४ नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडित मुलीच्या घरासमोर येऊन तिच्याशी भांडण केले होते. त्याने तिला आणि तिच्या मामालाही मारहाण केली होती. त्याने तिच्या घारातील लोकांना ठार मारण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३५४-डी कलमांतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, ५०४ कलमांतर्गत १ वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड, ५०६ (भाग २) कलमांतर्गत २ वर्षे कारावास, १ हजार रुपये दंड, ३२३ कलमांतर्गत ६ महिने कारावास, ५०० रुपये दंड, पोक्सोच्या कलम १२ अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास, १ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीला एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारतर्फे सहायक सरकारी वकील वर्षा आगलावे तर आरोपीच्या वतीने अॅड. पी. पी. पात्रीकर यांनी काम पाहिले.