नागपुरात मनपाच्या दोन बसची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:38 IST2018-10-02T00:37:49+5:302018-10-02T00:38:53+5:30
महापालिकेच्या आपली बसच्या सीताबर्डी ते कन्हान फेऱ्या करणाऱ्या दोन बसवर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच चालकाला जबर मारहाण केली. यामुळे चालक व वाहकांत दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

नागपुरात मनपाच्या दोन बसची तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आपली बसच्या सीताबर्डी ते कन्हान फेऱ्या करणाऱ्या दोन बसवर सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास असामाजिक तत्त्वांनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच चालकाला जबर मारहाण केली. यामुळे चालक व वाहकांत दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरात बसची तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी बसच्या समोर असलेली गाडी बाजूला करण्यावरून बसची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. आरोपींना अद्याप जामीन मिळालेला नसताना सोमवारी पुन्हा बसववर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. यात एमएच ३१ सीए-६०३३ व एमएच ३१ सीए-६२२७ या बसच्या काचा फुटल्याने नुकसान झाले आहे. बसवर दगडफेक करण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना दुखापत होण्याचा धोका आहे. अशा असामाजिक तत्त्वांना आळा घालण्याची गरज आहे.
या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी. बसची तोडफोड करण्याचे प्रकार सुरू राहिल्यास या मार्गावरील बससेवा बंद करावी लागेल अशी माहिती परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिली.