नागनदी संवर्धन प्रकल्पाला केंद्राकडून ‘गो अहेड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:41+5:302021-03-04T04:11:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा भार सहन करणाऱ्या नागनदीच्या संवर्धन प्रकल्पाला अखेर केंद्र शासनाने मंजुरी ...

नागनदी संवर्धन प्रकल्पाला केंद्राकडून ‘गो अहेड’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील अनेक वर्षांपासून प्रदूषणाचा भार सहन करणाऱ्या नागनदीच्या संवर्धन प्रकल्पाला अखेर केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. केंद्राने या प्रकल्पासाठी २ हजार ११७ कोटी रुपयांच्या खर्चाला हिरवी झेंडी दाखविली आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयाकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. नागनदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये वाहणारे प्रक्रिया न झालेले सांडपाणी, घनकचरा व इतर घटकांच्या प्रदूषणाची पातळी प्रकल्पाच्या माध्यमातून कमी करण्यात येणार आहे.
शहराच्या मध्य भागातून वाहणारी ही नदी सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातून निघणाऱ्या घाण पाण्यामुळे प्रचंड प्रदूषित आहे. नागनदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी, कचरा टाकला जातो. मागील अनेक वर्षांपासून नदीच्या संवर्धनाची मागणी होत आहे. अखेर नागनदी संवर्धन प्रकल्पाला राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत मंजुरी मिळाली. मंगळवारी जागतिक बँकेच्या चमूसोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. या बैठकीला उपस्थित होते.
या प्रकल्पाच्या माध्यमातून, तसेच या नदीला मिळणारे नाले आणि उपनद्या यातून होणारे प्रदूषणही कमी करण्यासाठी संचालनालय काम करणार आहे.
राज्याचादेखील राहणार वाटा
या प्रकल्पाचा एकूण खर्च २११७.७१ कोटी एवढा आहे. प्रकल्पामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महानगरपालिका यांचा अनुक्रमे ६०:२५:१५ या प्रमाणात हिस्सा आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासन जपानची वित्तीय संस्था जिकाकडून १८६४.३ कोटी रुपये अर्थसाहाय्य घेण्यात येणार आहे.
२३५ नाल्यांमधून प्रदूषित पाणी
नागनदीला नागपूर शहराच्या हद्दीतच पिवळी नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाला या मोठ्या नाल्यांसह जवळपास २३५ लहान-मोठे नाले येऊन मिळतात. त्यामुळे नागनदीचे एक मोठे गटारच बनले आहे. त्यामुळे शहरात १७ किलोमीटर लांबीची नदी जवळजवळ मृतप्राय झाली आहे.
गोसेखुर्दमध्ये जमा होते दूषित पाणी
नाग, पिवळी नदीत रोज ३२ कोटी लिटर सांडपाणी
नागपूर शहराला दररोेज ६५० एमएलडी (मिलियन लिटर पर डे) पाणीपुरवठा होतो. त्यातून ५२० एमएलडी सांडपाणी बाहेर पडते. यातील ३२० एमएलडी सांडपाणी नाग आणि पिली नद्यांमध्ये दररोज सोडले जाते. पुढे नागनदीतील दूषित पाणी कन्हान व वैनगंगा नदी, तसेच गोसेखुर्द धरणात जमा होते. नागनदी संवर्धन प्रकल्पामुळे प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत मिळेल असा दावा करण्यात येत आहे.