नाग नदीला नागपूर शहराच्या हद्दीतच पिवळी किंवा पिली नदी, हत्ती नाला, सत्ती नाला, गड्डीगोदाम नाला, बाळाभाऊपेठ नाला, बुरड नाला, बोरियापुरा नाला, डोबीनगर नाला, लाकडीपूल नाला, तकिया नाला, नरेंद्रनगर नाला या मोठ्या नाल्यांसह जवळपास २३५ लहान-मोठे नाले येऊन मिळतात. हे सर्व नाले पाण्यात पायदेखील ठेवता येणार नाही, असे अत्यंत प्रदूषित पाणी नदीत आणून सोडतात. त्यामुळे नाग नदीचे एक मोठे गटारच बनले आहे. त्यामुळे शहरात १७ किलोमीटर लांबीची नदी जवळजवळ मृत:प्राय झाली आहे.
.......
नाग, पिली नदीत रोज ३२ कोटी लिटर सांडपाणी
नागपूर शहराला दररोेज ६५० एमएलडी (मिलियन लिटर पर डे) पाणीपुरवठा होतो. त्यातून ५२० एमएलडी सांडपाणी बाहेर पडते. यातील ३२० एमएलडी सांडपाणी नाग आणि पिली नद्यांमध्ये दररोज सोडले जाते. पुढे नाग नदीतील दूषित पाणी कन्हान व वैनगंगा नदी तसेच गोसेखुर्द धरणात जमा होते. यामुळे गोसेखुर्द प्रकल्पात दूषित पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे