स्वाईन फ्लूने निरीक्षकाच्या मृत्यूमुळे एनएडीटीचा सोहळा रद्द
By Admin | Updated: February 20, 2015 02:14 IST2015-02-20T02:14:59+5:302015-02-20T02:14:59+5:30
स्वाईन फ्लूची दहशत किती असू शकते याचा अंदाज २० दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेतून समोर आले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला (एनएडीटी) ...

स्वाईन फ्लूने निरीक्षकाच्या मृत्यूमुळे एनएडीटीचा सोहळा रद्द
नागपूर : स्वाईन फ्लूची दहशत किती असू शकते याचा अंदाज २० दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेतून समोर आले. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला (एनएडीटी) आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे समजताच, महत्त्वपूर्ण सोहळा अनिश्चित काळासाठी रद्द केला.
एनएटीडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा एक निरीक्षक स्वाईन फ्लू संशयित म्हणून रामदासपेठ येथील इस्पितळात उपचार घेत होता. २९ जानेवारी रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, दुसऱ्याच दिवशी ३० जानेवारी रोजी एनएडीटीने आयआरएस प्रक्षिणार्थ्यांच्या ४३ व्या बॅचचा ‘ओरिएन्टेशन प्रोग्राम’ आयोजित केला होता.
ज्यात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी), नवी दिल्लीतील काही सदस्यही सहभागी होणार होते. परंतु निरीक्षकाच्या मृत्यूची माहिती पसरताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाईन फ्लूची शंका निर्माण केली. यामुळे एनएडीटी प्रशासन हरकतीत आले आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी रोजी होणारा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला. इतरांमध्ये स्वाईन फ्लू पसरण्याची शक्यता असल्याची कारणे देत, हा सोहळा रद्द करण्यात आला. एनएडीटीची ही शंका दोनच दिवसात खरी ठरली. निरीक्षकाचा स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
निरीक्षकाच्या मृत्यूनंतर एनएडीटीने विशेषज्ञ डॉक्टरांची एक चमू तयार केली. कर्मचारी त्यांचे कुटुंब, आयआरएस प्रशिक्षणार्थ्यांची स्वाईन फ्लूच्या भीतीपोटी तपासणी सुरू केली. याच दरम्यान ६८ व्या बॅचमधील एका आयआरएस प्रशिक्षणार्थ्याचा स्वाईन फ्लूचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याला लगेच उपचारासाठी त्याच्या घरी हैदराबाद येथे पाठविले. सूत्रानुसार, या घटनेनंतर शहरातील आयकर विभागात स्वाईन फ्लू पसरण्याची भीती निर्माण झाली. विभागाने तत्काळ आपल्या स्टाफला तपासणीचे आदेश दिले. यादरम्यान सहायक आयुक्त स्तरावरील दोन अधिकाऱ्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना उपचारासाठी सुटीवर पाठविण्यात आले.
या प्रकरणात एनएडीटीच्या उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, स्वाईन फ्लूमुळे ४५ दिवसांपूर्वी एका जणाचा मृत्यू झाला. एक अन्य अधिकारीही पॉझिटिव्ह आला. परंतु वेळेवर उपचार घेतल्याने तो बरा झाला. खबरदारी म्हणून संपूर्ण अधिकारी, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यात कुणालाच स्वाईन फ्लू नसल्याचे स्पष्ट झाले. स्वाईन फ्लूच्या भीतीमुळे कोणताही सोहळा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आलेला नाही. एनएडीटीचे कार्य सुरळीत सुरू आहे.
यावर ‘लोकमत’ प्रतिनिधीने रद्द झालेल्या सोहळ्याविषयीची माहिती देत, आयआरएस प्रशिक्षणार्थ्यांची ४३ व्या बॅचचा रद्द झालेला सोहळा आणि ओरिएन्टेशन कोर्सचे आयोजन एनएडीटीमध्ये आज होऊ घातले आहे, असे सांगताच संबंधित अधिकारी स्तब्ध झाले. (प्रतिनिधी)