‘माझी मेट्रो’ ने घेतला रस्त्याचा ताबा!

By Admin | Updated: August 11, 2016 01:58 IST2016-08-11T01:58:26+5:302016-08-11T01:58:26+5:30

गतीने काम सुरू असल्याचा दावा करणाऱ्या नागपूर मेट्रोने जनसामान्यांपुढे अडचणी निर्माण केल्या आहेत.

'My Metro' took control of the road! | ‘माझी मेट्रो’ ने घेतला रस्त्याचा ताबा!

‘माझी मेट्रो’ ने घेतला रस्त्याचा ताबा!

विना कामाने लावले बॅरिकेट : वाहतुकीचा खोळंबा
नागपूर : गतीने काम सुरू असल्याचा दावा करणाऱ्या नागपूर मेट्रोने जनसामान्यांपुढे अडचणी निर्माण केल्या आहेत. ज्या रस्त्यावर कामही करण्यात येणार नाही, अशा रस्त्यावरही बॅरिकेट लावून रस्ते अडवून धरले आहे. बॅरिकेट लावल्याने अरुंद झालेल्या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. अपघाताची शक्यता बळावली आहे. अजनी रेल्वे स्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्यापर्यंतच्या रस्त्यावर हे दृश्य बघायला मिळते.
‘वर्क इन प्रोग्रेस’ चे बोर्ड लावून वेगाने काम सुरू असल्याचे भासविणाऱ्या ‘माझी मेट्रो’च्या कामाची स्थिती जाणुन घेण्यासाठी बुधवारी दुपारी लोकमतची टीम अजनी रेल्वे स्टेशन ते धंतोली पोलीस ठाण्याच्या रोडवर पोहचली. हातात हिरवी झेंडी घेऊन एक कर्मचारी वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र वाहतुक खोळंबल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत होता. लोकमतच्या टीमने या कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, त्याने सांगितले की, गेल्या ३-४ दिवसापासून बॅरिकेट लावण्यात आले आहे.
परंतु काम सुरू नसतानाही बॅरिकेट का लावण्यात आले असे विचारल्यावर तो म्हणाला की, २-३ दिवसात मोठी मशीन येणार आहे. त्यानंतर काम सुरू होणार आहे. त्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात एसटी बसेसची वाहतूक असते. वर्धा, चंद्रपूरकडे जाणाऱ्या बसेस रहाटे कॉलनी मार्गे याच रस्त्याने जातात.

वाहतुकीच्या कोंडीमुळे अ‍ॅम्ब्युलन्स फसली
बॅरिकेटचा सर्वाधिक त्रास रुग्णांना सोसावा लागत आहे. धंतोलीत मोठ्या संख्येने रुग्णालय आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अ‍ॅम्ब्युलन्सची वाहतूक होते. बुधवारी दुपारी लोकमतच्या टीमपुढेच अरुंद रस्त्यामुळे एसटी बसला मार्ग काढताना अडचण येत होती. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अशातच एक अ‍ॅम्ब्युलन्स याच रस्त्यावरून आली आणि वाहतुकीच्या कोंडीत फसली. त्यामुळे काही वाहनचालकांनी स्वत: पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करून अ‍ॅम्ब्युलन्सला मार्ग करून दिला.

Web Title: 'My Metro' took control of the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.