‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:39 AM2020-09-15T00:39:53+5:302020-09-15T00:42:15+5:30

राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

The 'My Family, My Responsibility' campaign begins | ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी ही मोहीम प्रभावी राबवावी, अशा सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या आहेत. शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक होत आहे. ग्रामीणमधील बाधितांच्या संख्येने १० हजाराचा आकडा गाठला आहे.
या मोहिमेतून शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्ती आजारी असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश: भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशासनाला सूचनामोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आले आहेत. त्यात एक आरोग्य कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज ५० घरांना भेट देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचा ताप मोजतील. ‘कोमॉर्बिड’ आहे का याची माहिती घेतील. ताप, खोकला, दम लागणे, एसपीओ २ कमी अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फीव्हर क्लिनिकमध्ये पाठवण्याचा सल्ला देतील. कोमॉर्बिड रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री करतील. प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देतील. त्यानुसार कामकाज चालेल. कोमॉर्बिड रुग्णासाठी औषधांचा साठा रुग्णालय स्तरावर उपलब्ध करून द्यावा. प्रत्येक तालुक्यात एक ताप उपचार केंद्र कार्यरत करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची निर्मिती करावी. तिथे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे आदी या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणार आहे.

Web Title: The 'My Family, My Responsibility' campaign begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.