लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : येथील ग्रामीण रुग्णालयात रानमांगली येथील दर्शना नेपाल मानेगुरूदे या महिलेला प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले. महिलेने रविवारी बाळाला जन्म दिला, परंतु वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मंगळवारी दुपारी बाळाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मौदा येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या रानमांगली येथील महिलेला प्रसूतीकरिता ग्रामीण रुग्णालय मौदा येथे दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टर आणि नर्स यांनी बाळावर वेळेवर उपचार केले नाही. सोमवारी रात्री बाळाची प्रकृती खालावलेली होती. हालचाल करणे बंद झाले होते. रात्री डॉक्टर बाळाला तपासून आपल्या रूममध्ये गेले तर आलेच नाही. रात्रपाळीला असलेली नर्स रात्री १२ वाजतापासून वार्डात हजर नव्हती. महिलेकडील नातेवाईकांनी संपूर्ण दवाखाना पाहिला, परंतु ना डॉक्टर मिळाले ना नर्स मिळाली.
सकाळी सात वाजता डॉक्टर आले आणि बाळाला तपासले व औषधं दिली. परंतु बाळाची प्रकृती नाजूक होती. नागपूर येथे नेतेवेळी बाळाचा रस्त्यात मृत्यू झाला. बाळाच्या मृत्यूसाठी डॉक्टर व नर्स जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता राकेश वाघमारे यांनी केला.
रुग्णवाहिका वेळेवर मिळाली नाही
बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाईकांनी नागपूर येथे नेण्याचे ठरविले. नातेवाईकांनी १०८ वर फोन लावले, परंतु रुग्णवाहिका वेळेवर आली नाही. दवाखान्याच्या आवारात रुग्णवाहिका आहे. परंतु तिचा मेंटेनन्स सुरू आहे, असे डॉ. उत्तम पाटील यांनी सांगितले. दोन तास वाट पाहूनसुद्धा रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे बाळाला नागपूर येथे नेण्याकरिता उशीर झाला. बाळाचा रस्त्यात मृत्यू झाला.
डॉक्टर व नर्सचा निष्काळजीपणा..
डॉक्टर व नर्सच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला. बाळाला काय झाले काय नाही याची कल्पना आम्हाला नव्हती. डॉक्टर व नर्स यांनी काहीही कळवले नाही. बाळ जन्मताच प्रकृती बरोबर नाही त्यामुळे आपण यांना भंडारा किंवा नागपूरला रेफर करावे, असे डॉक्टर यांनी सांगितले नाही. या दवाखान्यात कोणताही उपचार यांनी केला नाही. त्यामुळे माझ्या बाळाचा जीव गेला.दर्शना मानेगुरुदे, मौदा
"ज्या दिवशी महिला ग्रामीण रुग्णालयात भरती झाली. त्या दिवशीपासून महिलेची वेळोवळी तपासणी सुरू होत होती. परंतु बाळ कमी वजनाचे असल्याने मेडिकल येथे रेफर करण्यात आले. त्यांनी मेडिकल कॉलेज येथे न नेता खासगी दवाखान्यात नेले असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात आमच्याकडून रुग्णांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही."- डॉ. उत्तम पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मौदा.