पं.स.च्या बँक खात्यातून १४ लाखांची परस्पर उचल

By Admin | Updated: November 1, 2014 02:47 IST2014-11-01T02:47:47+5:302014-11-01T02:47:47+5:30

भिवापूर पंचायत समितीच्या शासकीय बँक खात्यातून तब्बल १४ लाख ५८ हजार ७२ रुपयांची परस्पर उचल करण्यात...

A mutual withdrawal of Rs 14 lakh from PMS bank account | पं.स.च्या बँक खात्यातून १४ लाखांची परस्पर उचल

पं.स.च्या बँक खात्यातून १४ लाखांची परस्पर उचल

शरद मिरे भिवापूर
भिवापूर पंचायत समितीच्या शासकीय बँक खात्यातून तब्बल १४ लाख ५८ हजार ७२ रुपयांची परस्पर उचल करण्यात आल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. यासाठी संबंधित व्यक्तीने तीन धनादेशांचा वापर केला. मात्र, ज्या धनादेशाद्वारे ही रक्कम उचलण्यात आली, त्या क्रमांकाचे मूळ धनादेश पंचायत समिती कार्यालयात असल्याने रकमेची उचल करण्यासाठी बनावट धनादेशांचा वापर केल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
भिवापूर पंचायत समितीचे बँक खाते स्थानिक भारतीय स्टेट बँकच्या शाखेत असून, ते खंडविकास अधिकारी मनोहर बारापात्रे यांच्या नावे आहे. त्यांच्या ३३६५५२९३१५६ या खाते क्रमांकामध्ये पंचायत समितीअंतर्गत असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन देयकाची मोठी रक्कम जमा करण्यात आली आहे. या खात्यांतर्गत पंचायत समितीकडे असलेल्या ‘चेकबुक’ मधील क्र. ७४९१९१ हा १० हजार ३३४ रुपयांचा धनादेश १ आॅक्टोबर २०१४ या तारखेत आयडीबीआय शाखा बेसूरच्या नावे तर, क्र. ७४९१९५ हा २ लाख ४८ हजार ४५३ रुपयांचा धनादेश बँक आॅफ इंडिया शाखा भिवापूरच्या नावे आणि क्र. ७४९१९६ हा १९ हजार ४३३ रुपयांचा धनादेश आरोग्य कें द्र नांदच्या नावे कार्यालयाच्या रोख पुस्तिके द्वारे अदा करण्यात आले.
सदर धनादेश बँकेत जमा करण्यासाठी नेले असता, या तिन्ही क्रमांकाचे धनादेश आधीच वटविण्यात आले असून एकूण १४ लाख ५८ हजार ७२ रुपयांची उचल करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती कर्मचाऱ्याला बँक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सदर माहिती कळताच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली. ही रक्कम वेगवेगळ्या दिवशी उचल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. या प्रकारामुळे पंचायत यमिती कर्मचारी व बँक अधिकारी यांच्यात वादही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
बँक शाखा व्यवस्थापकांनी यापूर्वी वटविण्यात आलेल्या या तिन्ही धनादेशाच्या प्रती आणि पत्र पंचायत समितीकडे पाठविले. या पत्रानुसार नागपूर येथील सूरजमल जीवनलाल तिवारी नामक तरुणाच्या नावे २६ सप्टेंबर २०१४ रोजी धनादेश क्रमांक ७४९१९५ द्वारे ४ लाख ८० हजार रुपये, याच नावे पुन्हा ३० सप्टेंबर २०१४ रोजी धनादेश क्र. ७४९१९६ द्वारे ४ लक्ष ९५ हजार ३०० रुपये आणि १ आॅक्टोबर २०१४ रोजी धनादेश क्र. ७४९१९१ द्वारे ४ लक्ष ८२ हजार ७७२ रुपयांची उचल करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे. सदर तिन्ही धनादेश दिनेश तिवारी याच्या नावे वटविण्यात आल्याचेही बँकेने स्पष्ट केले. पंचायत समिती अधिकाऱ्यांकडे या तिन्ही क्रमांकाचे मूळ धनादेश कार्यालयात शाबूत असताना बँकेत जमा करण्यात आलेले त्याच क्रमांकाचे तिन्ही धनादेश कुणी व कसे बँकेत जमा केले याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.

Web Title: A mutual withdrawal of Rs 14 lakh from PMS bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.