सांप्रदायिक शक्तीचा मूक निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2016 02:55 IST2016-03-01T02:55:04+5:302016-03-01T02:55:04+5:30
राज्यघटनेने निर्माण केलेल्या समता, बंधूता व एकतेच्या वातावरणात विष मिसळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ....

सांप्रदायिक शक्तीचा मूक निषेध
गांधीवादी कार्यकर्ते एकत्र : संविधान चौकात केले आंदोलन
नागपूर : राज्यघटनेने निर्माण केलेल्या समता, बंधूता व एकतेच्या वातावरणात विष मिसळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या सांप्रदायिक व हुकूमशाही शक्तीचा निषेध करण्यासाठी गांधीवादी कार्यकर्त्यांनी सोमवारी संविधान चौकात मूक धरणे आंदोलन केले.
आंदोलनात सुमारे १०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात माजी खासदार विलास मुत्तेमवार, लीलाताई चितळे, हरिभाऊ केदार, उमेशबाबू चौबे, केशवराव शेंडे, डॉ. चित्रा सूर, डॉ. रतिनाथ मिश्रा, जम्मू आनंद, मा.म. गडकरी, यादवराव देवगडे, दत्तात्रय बर्गी, धनंजय धार्मिक, रवी गुडधे, आत्माराम उखळकर, बाबूराव झाडे, डॉ. प्रकाश तोवर, डॉ. सुनिती देव, अॅड. रेखा बारहाते, धर्मेंद्र राजपूत, अमिताभ पावडे, सत्यनारायण शर्मा, अनंतराव अहमदाबादकर आदींचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांनी सुमारे दोन तास काहीही न बोलता शांततेच्या मार्गाने सांप्रदायिक व हुकूमशाही शक्तीचा निषेध केला. वैष्णव जन तो... या भजनाने आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन पूर्वनियोजित असल्यामुळे संविधान चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनाला स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, महात्मा गांधी विचार मंच, जागृत नागरिक मंच यासह अन्य गांधीवादी संस्था व संघटनांचा पाठिंबा होता.
संविधान चौकात पत्रके वाटून आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश कसा राहावा यासाठी तत्कालीन नेत्यांनी राष्ट्रीयस्तरावर चिंतन केले. त्यातून राज्यघटना अस्तित्वात आली. त्याद्वारे देशात सामाजिक न्याय, समता, बंधूता व एकता ही मूल्ये रुजली. धार्मिक, जातीय व प्रादेशिक विविधता असूनही देश संघटित राहिला. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून देशाची अखंडता भंग होण्याच्या मार्गावर आहे. समाजात विद्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विकासाच्या नावावर सत्ता मिळविणारे राजकारणी धर्मांध शक्तीला पाठिंबा देत आहे. या विध्वंसक परिस्थितीमुळे देशातील नागरिक व्यथित झाले आहेत. परिणामी हे मूक आंदोलन करण्यात आले.(प्रतिनिधी)