माझ्यासाठी संगीत हेच जीवन
By Admin | Updated: February 9, 2015 00:57 IST2015-02-09T00:57:32+5:302015-02-09T00:57:32+5:30
त्याचे व्यक्तिमत्त्वच संगीतमय आहे. जीवनात टक्केटोणपे खाऊन आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला कैलाश खेर यांच्या बोलण्यात जीवनाचे तत्त्वज्ञान झळकते. त्यांच्या गायनाचे

माझ्यासाठी संगीत हेच जीवन
सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर : लोकमतशी मनमोकळी बातचित
मेहा शर्मा - नागपूर
त्याचे व्यक्तिमत्त्वच संगीतमय आहे. जीवनात टक्केटोणपे खाऊन आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला कैलाश खेर यांच्या बोलण्यात जीवनाचे तत्त्वज्ञान झळकते. त्यांच्या गायनाचे कोट्यवधी चाहते जगभरात आहेत पण कैलाश खेर यांच्यातला माणूस जमिनीवर पाय ठेवून आहे. त्यामुळेच त्यांनी गायिलेली गीते थेट रसिकांच्या काळजात घर करतात. संगीत आणि गायन हेच आज त्यांचे आयुष्य आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी माझ्यासाठी संगीत हेच जीवन असल्याचे मत व्यक्त करताना आपला संगीत प्रवास मोकळेपणाने उलगडला.
ंकैलाश म्हणाला, आपल्याला काय व्हायचे ते आपण ठरविले पाहिजे. प्रसिद्धी मिळाल्यावर त्याचा उन्माद करण्यात अर्थ नाही कारण माणूस तोच असतो पण त्याच्यातली कला त्याला हा सन्मान देत असते. मी स्वत:कडे यासंदर्भात लक्ष देतो. मी स्वत:ला माझ्यापासून हरवू इच्छित नाही. त्यामुळे प्रसिद्धीच्या पलिकडे माझ्यातले माणूसपण टिकविण्याचा माझा प्रयत्न आहे. मी ईश्वराला मानतो. मी त्याच्याकडे छोटीशी प्रार्थना केली होती. मला जगण्यापुरता पैसा मिळावा आणि मला काहीतरी होता यावे. पण त्या शक्तीने मला भरभरून दिले आहे, त्याचे समाधान मला आहे.
संगीत हेच माझे आयुष्य आहे आणि संगीताशिवाय माझ्या जगण्याचा काहाही अर्थ नाही. संगीत केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर त्यापलिकडे संगीत ही त्या निसर्गशक्तीची आराधना, प्रार्थना, इबादत आहे. याचा प्रत्यय मला अनेकदा येतो. माझे घर सोडून मी दिल्लीला आलो तेव्हा खूप खस्ता खाल्या. या शहराने मला खूप काही शिकविले आहे. येथे जगायचे असेल तर तुम्हाला अष्टपैलू असावे लागते आणि परिस्थिती तुम्हाला तसे घडवितही जाते. मी त्या काळात संगीत शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण परिस्थितीपुढे शरण जावे लागले. त्यात अनेक अडचणीही होत्याच. पण माझ्या संगीतात, गायनात ज्या भावना आहे त्या मी अनुभवलेल्या आहेत. मी माझ्या बालपणात जे जीवन अनुभवले आणि वेगवेगळ्या अनुभवांना, समस्यांना सामोरे गेलो त्यातूनच मी घडत गेलो. माझ्या गायनात संगीताच्या शिक्षणापेक्षा जगण्यातल्या या भावना त्यामुळेच आपोआप येतात आणि रसिकांना ते अपील होते, असे कैलाश यांनी सांगितले. संगीत हा माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे. माझ्यासाठी संगीत हे अध्यात्म आहे, तत्त्वज्ञान आहे, सहजपणे हृदयाला हात घालणारे संगीत माझ्यासाठी रोमॅण्टिक आहे. ते जीवनाचे सौंदर्य सांगणारेही आहे. यश मिळविण्यासाठी प्रामाणिकपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. कुठल्याही जाहिरातबाजीने तुम्ही लोकांचे खरे प्रेम घेऊ शकत नाही त्यासाठी कलावंताजवळ अस्सल कलाच असावी लागते. कलावंतांकडे गुणवत्ता आणि दर्जा नसेल तर तुम्ही कलेच्या क्षेत्रात टिकू शकत नाही. माझ्या गायनाशी मी प्रामाणिक असल्याने आणि त्यात शंभर टक्के जीव ओतल्यानेत मला हे यश मिळू शकले.
माझा विश्वास निसर्गावर आहे. निसर्ग सौंदर्याने भरला आहे. मला वाटते, भविष्य हा केवळ आभास आहे. भविष्याबद्दल आपण काहीही ठरवू शकत नाही. आजचा दिवस आपला आहे. आपले वर्तमान आपले आहे. त्यामुळेच आजचे जगणे मला महत्त्वाचे वाटते. आज माझ्यावर लोक प्रेम करतात, त्यातच माझे जगणे मी अनुभवतो आहे. तुमच्या मनाचे सौंदर्य आणि निसर्गाचे सौंदर्य एकरूप झाले तर ते अद्वैत एका असीम सुखाचा आनंद देणारे असते. भविष्याची चिंता न करता आज मी आनंदाने आणि समाधानाने जगतो आहे. माझ्या बायकोपासून मी बराच काळ दूर असतो पण मी रोमॅण्टिक गीते लिहितो, गातो, याबाबात अनेकांना कुतूहल वाटते. पण ईश्वर आपल्याला दिसत नसला तरी त्याच्यावर प्रेम असतेच. जिथे प्रामाणिकता आणि अस्सलता असते तेथे प्रेमही शाश्वत असते. त्यासाठी व्यक्ती जवळ असणे वा दूर असणे महत्त्वाचे नसते. प्रेम ही शाश्वत आणि मनाची भावना आहे. त्यामुळे मी रोमॅण्टिक गीतांमध्येही रंगतो.
कलावंत म्हणून जगभर फिरत असतो. एखादा कलावंत हा आपल्या देशासाठी आपली कला आणि संस्कृतीचा प्रतिनिधीच असतो. विदेशात अनेक कार्यक्रम करताना मी भारतीय मूल्य आणि संस्कारांची माहिती देतो. अनेकांना त्याबद्दल कुतूहलही वाटते पण सोशल नेटवर्कींग साईट्सवर माझे फॉलोअर पाहिल्यावर त्यांना विश्वास बसतो. ही भूमी अध्यात्म परंपरेची, बंधुतेची, प्रेम देणारी आहे. हाच तो देश आहे जेथे बोलल्याशिवाय संवाद घडू शकतो, याचे विदेशात फार औत्सुक्य आहे.
स्त्री ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे. तिचा अवमान म्हणजे ईश्वराचा अवमान आहे. स्त्री भ्रूणहत्यांसारखे विषय थांबविण्यासाठी पालकांनी आणि स्त्रियांनीच आपल्या पाल्यांवर संस्कार करण्याची गरज आहे. घरापासून हा संस्कार मुलांना मिळाला तर स्त्री भ्रूणहत्या आणि स्त्रीची अवमानना करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. चित्रपट क्षेत्रात नवोदितांना प्रस्थापित होण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. पण जिद्द आणि दर्जा असेल तर येथे यशस्वी होता येते, असे कैलाश म्हणाले.