हिंगण्यात महाविकास आघाडीची मुसंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:14+5:302021-01-19T04:10:14+5:30
मनाेज झाडे हिंगणा : राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीने हिंगण्यात भाजपाला चांगलाच झटका दिला आहे. ...

हिंगण्यात महाविकास आघाडीची मुसंडी
मनाेज झाडे
हिंगणा : राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने स्थापन केलेल्या महाविकास आघाडीने हिंगण्यात भाजपाला चांगलाच झटका दिला आहे. हिंगण्यात भाजपाचे विद्यमान आमदार व चार जिल्हा परिषद सदस्य असतानाही पराभवाचे चटके सहन करावे लागले आहे. हा विजय महाविकास आघाडीचा असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला.
तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडी समर्थित गटांना स्पष्ट बहुमत मिळाले, तर भाजपला एकाच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी व भाजप यांना बहुमतासाठी बहुजन समाज पार्टी समर्थित दोन विजयी उमेदवारांवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खडकी, किन्ही धानोली, आसोला सावंगी, दाभा आणि सातगाव या पाच ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक झाल्या. खडकी ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीचे पाच, तर भाजपाचे तीन सदस्य निवडून आले. किन्ही धानोली ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे सहा, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. आसोला सावंगी ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे पाच, तर भाजपचे चार उमेदवार निवडून आले. दाभा येथे भाजपला सहा, तर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून आले. तालुक्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या सातगाव ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीला सात, भाजपला सहा, तर बहुजन समाज पार्टी समर्थित दोन उमेदवार निवडून आल्याने कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे येथे बसपाचे उमेदवार सत्ता स्थापन करण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हीसुद्धा ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे बसपाचे उमेदवार कुणाला झुकते माप देते, हे बघणे महत्त्वाचे आहे.
महाविकास आघाडीच्या पॅनलखाली निवडून आलेल्या सर्व सदस्यांचे माजी मंत्री रमेश बंग यांनी स्वागत केले. यावेळी जि.प. सभापती उज्वला बोढारे, जि.प. सदस्य दिनेशचंद्र बंग, पं.स. सभापती बबनराव अव्हाळे, सुनील बोंदाडे, प्रवीण खाडे, खेमसिंग जाधव, विलास भोंबले, विनोद ठाकरे, राजू गोतमारे, श्याम गोमासे, पंढरीनाथ खाडे, सुरेश निघोट, बंडू बोंडे, महेश बंग आदी उपस्थित होते.
....
ईश्वर चिठ्ठीने विजयी झाल्या ज्योत्स्ना कोल्हे
सातगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ मध्ये ज्योत्स्ना सुभाष कोल्हे व ज्योती क्रिष्णा नागपूरे या दोन महिला सदस्यांना सारखी (१९८) मते पडली. त्यामुळे निवडणुक निर्णय अधिकाºयांनी ईश्वर चिठ्ठीच्या आधारे विजयी उमेदवार घोषित केला. ज्योत्स्ना कोल्हे यांना ईश्वर चिठ्ठीचा लाभ झाला. तर खडकी ग्रामपंचायतीच्या एका उमेदवाराचा तीन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता. त्या उमेदवारासाठी होणारी निवडणुक रद्द करण्यात आली.