नंदनवनमध्ये महिलेची हत्या
By Admin | Updated: November 21, 2015 03:16 IST2015-11-21T03:16:19+5:302015-11-21T03:16:19+5:30
नंदनवनमधील गोपाळनगरात शुक्रवारी दिवसाढवळ्या दोघांनी एका महिलेची हत्या करून पळ काढला.

नंदनवनमध्ये महिलेची हत्या
हुडकेश्वरमध्ये तरुणाचा गेम :
हत्यासत्र थांबेना, उपराजधानी अस्वस्थ
नागपूर : नंदनवनमधील गोपाळनगरात शुक्रवारी दिवसाढवळ्या दोघांनी एका महिलेची हत्या करून पळ काढला. रमाबाई आनंदराव मडावी (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. हुडकेश्वरमध्येही कुणाल विनोद कावरे (वय ३२) या तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आली. उपराजधानीत गेल्या चार दिवसात घडलेली हत्येची ही चौथी घटना आहे. पोलिसांतर्फे शहरभर नाकेबंदी आणि कोम्बिंग आॅपरेशनसारखे प्रयत्न करूनही हत्यासत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने सामान्य नागरिकांसोबतच पोलीस दलातही तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या घराशेजारी मडावी यांचे घर आहे. रमाबाई मडावी यांच्या पतीचे निधन झाले असून, त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले आहेत. मुलगा सुभाष महापालिकेच्या पाण्याचा टँकर चालवतो.
तो आणि रमाबाई हे दोघे मायलेक राहातात. त्यांच्याकडे भाडेकरूसुद्धा आहेत.
‘त्या’ दोघांचे कृत्य?
नागपूर : नेहमीप्रमाणे सुभाष शुक्रवारी आपल्या कामावर निघून गेला. दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक रमाबाईच्या किंकाळ्या ऐकू आल्याने भाडेकरू योगिता सोनटक्के आणि एक शेजारी धावले. रमाबाई पोटाला हात लावून बाहेर आल्या. त्यांनी दोन तरुणांना पळून जाताना बघितले. रमाबाई गंभीर जखमी होत्या. योगिता आणि अन्य एकाने त्यांना आधार दिला. ‘त्या’ दोघांनी शस्त्राचे घाव घातल्याचे सांगून रमाबाई खाली कोसळल्या. त्यांच्या जखमांमधून रक्ताची धार वाहत असल्याने तेथे थारोळे साचले. योगिताने आरडाओरड केल्यामुळे अन्य शेजारीही धावले. त्यांनी रमाबाईला प्रारंभी बाजूच्या एका खासगी रुग्णालयात आणि नंतर शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रमाबाईला मृत घोषित केले.
परिसरात खळबळ
घटनास्थळ प्रभाग क्रमांक ४५ मध्ये येते. गजबजलेल्या या परिसरात सुस्वभावी रमाबाई सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनात अग्रस्थानी राहायच्या. त्यामुळे त्यांच्या हत्येच्या वृत्ताने परिसरात खळबळ निर्माण झाली. भाजयुमोचे बंटी कुकडे तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी रमाबार्इंच्या उपचारासाठी धावपळ चालवली. पोलिसांनाही कळविले.
संशयित ‘नॉट रिचेबल’
सुस्वभावी आणि प्रौढ रमाबार्इंची हत्या कोणत्या कारणामुळे झाली, असा प्रश्न नागरिकांना पडला. दरम्यान, माहिती कळताच नंदनवनचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांनीही भेट दिली. रमाबार्इंचे नातेवाईक तसेच शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका घरी भेट दिली. येथील तरुण बेपत्ता असून, त्याला वारंवार फोन करूनही त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय बळावला आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपींना पकडण्यात नंदनवन पोलिसांना यश आले नव्हते.
हुडकेश्वरमध्येही हत्या
हुडकेश्वरमधील ठवरे कॉलनीत राहणऱ्या कुणाल विनोद कावरे (वय ३२) याचीही गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. १७ नोव्हेंबरला दुपारी कुणालने दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या होत्या. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला होता. मात्र, वैद्यकीय अहवालात कुणालची गळा आवळून हत्या केल्याचे डॉक्टरांनी नमूद केले. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
कुणालला दारूचे व्यसन होते. तो दारूसाठी घरातच जुगार भरवायचा. आईवडिलांना मारहाण करायचा. जुगार भरविण्यात अडचण होत असल्यामुळे त्याने आईवडिलांना मारहाण करून घरातून हाकलून लावले होते. त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. तशात त्याने दोन्ही हातावर धारदार शस्त्राने वार केल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. शेजाऱ्यांंनी त्याला पट्टी बांधून दिली. जेवण दिले. मात्र नंतर कुणी गळा आवळला ते कळायला मार्ग नाही. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी पाच ते सात जणांना ठाण्यात आणून चौकशी केली. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
सक्करदऱ्यात हत्येचा प्रयत्न
कामाचे पैसे मागण्यास गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून आरोपी राहुल करडे आणि स्नेहा नावाच्या महिलेने हत्येचा प्रयत्न केला. रवी प्रभाकर नायक (वय ३३, रा. न्यू नंदनवन) असे जखमीचे नाव आहे. तो भांडेप्लॉट चौकातील गायत्री बिल्डींगमध्ये आरोपी राहूल हरडेच्या कार्यालयात काम करीत होता. १६ नोव्हेंबरला दुपारी ३.३० च्या सुमारास रवी आपला पगार मागण्यासाठी कार्यालयात गेला.
यावेळी त्याला आरोपी राहुल हरडे आणि स्नेहा नामक तरुणीने बेदम मारहाण केली. जीवाला धोका असल्याचे पाहून रवीने कसाबसा पळ काढून तिसऱ्या माळ््यावरून उडी मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या तक्रारीवरून सक्करदरा पोलिसांनी हरडे आणि स्नेहाविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
फराळ अन् घात
हत्या करून पळून जाणारे आरोपी रमाबाईच्या ओळखीचेच असावेत, असा दाट संशय आहे. घटनेच्या काही वेळेपूर्वीच ते घरात आले होते. त्यांना रमाबाईने दिवाळीचा फरार आणून दिला. मात्र, मोठ्या प्रेमाने फराळ आणून देणाऱ्या रमाबार्इंचा आरोपींनी घात केला. तीक्ष्ण शस्त्राने अनेक घाव घातल्यामुळे रक्ताच्या चिरकांड्या घरात उडाल्या. नाश्त्याच्या प्लेटमध्येही रक्त पडले.