पत्नीची गळा दाबून हत्या, आरोपीची जन्मठेप कायम
By Admin | Updated: July 7, 2014 00:57 IST2014-07-07T00:57:58+5:302014-07-07T00:57:58+5:30
दुसऱ्या पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या आरोपीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.

पत्नीची गळा दाबून हत्या, आरोपीची जन्मठेप कायम
हायकोर्ट : यवतमाळ जिल्ह्यातील घटना
नागपूर : दुसऱ्या पत्नीची गळा दाबून हत्या करणाऱ्या आरोपीची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे.
शंकर भुराजी पांडे (५७) असे आरोपीचे नाव असून तो होरकाड, ता. पुसद येथील रहिवासी आहे. पुसद सत्र न्यायालयाने २९ मार्च २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व २००० रुपये दंड, तर कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते.
न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
मृताचे नाव रेखा आहे. पतीसोबत वाद झाल्यामुळे ती शिवनी येथे माहेरी आली होती. आरोपीची पहिली पत्नी पंचफुला ढाकरे असून तिच्यापासून २ मुले व २ मुली आहेत. आरोपीसोबत भांडण झाल्यामुळे पंचफुला मुलांना घेऊन मुंगशी येथे माहेरी राहायला गेली होती. आरोपी नेहमीच शिवनीत जात होता. यामुळे त्याचे रेखासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले.
रेखा होरकाड येथे आरोपीसोबत राहायला लागली. घटनेच्या १२ ते १५ वर्षांपासून ते सोबत राहात होते. दरम्यान, आरोपीच्या पहिल्या पत्नीची मुलगी लग्नाची झाली. आरोपीने मुलीच्या लग्नासाठी रेखाला पैसे मागितले. रेखाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. आरोपी रेखाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. यातून रेखाची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
२४ डिसेंबर २००७ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपीने रेखाची गळा दाबून हत्या केली. यानंतर मृतदेह पोत्यात भरून पैनगंगा नदीत फेकून दिला. आरोपीने २९ डिसेंबर रोजी रेखा दागिने व रोख रक्कम घेऊन घरातून निघून गेल्याची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याने रेखाच्या माहेरीही अशीच माहिती दिली.
२ जानेवारी २००८ रोजी रेखाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. तिच्या गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला होता. हा मफलर आरोपी वापरत होता. रेखाच्या काकाने तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. सत्र न्यायालयात १४ साक्षीदार तपासण्यात आले होते. शासनातर्फे एपीपी संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)